ज्यांच्यामुळे शरद पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते सगळे…: संजय राऊत

0

शरद पवार हे देशाच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके असल्याची घणाघाती टीका भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केली होती. पण, ज्या नेत्यांमुळे शरद पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुनील तटकरे आणि हसन मुश्रीफ हे सगळे नेते आता भाजपसोबत आहेत, असा पलटवार संजय राऊत यांनी केला. एवढेच कशाला अमित शाह यांनी पुण्यात ज्या व्यासपीठावरुन शरद पवार यांच्यावर आरोप केले तिकडेच अशोक चव्हाण हे शाहांच्या बाजूला बसलेले होते. अशोक चव्हाण यांच्यावरही अमित शाह यांनीच भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. ही गोष्ट अमित शाह यांच्या लक्षात नाही का, असा सवाल संजय राऊत यांनी केला. ते सोमवारी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

अमित शाह हे शरद पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे म्होरके असल्याचा आरोप करतात. पण त्यांच्याच सरकारने शरद पवार यांना सामाजिक, राजकीय आणि कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मविभूषण पुरस्कार दिला होता. पंतप्रधान मोदी यांनी त्याबद्दल शरद पवार यांचे कौतुकही केले होते. मी शरद पवार यांचे बोट धरुन राजकारणात आलो, असेही मोदींनी म्हटले होते. पण आता अमित शाह हे शरद पवार यांच्यावर आरोप करत आहेत. याचा अर्थ पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यात भांडण झालेले दिसत आहे, त्यांच्यात मतभेद दिसत आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

पैसे देऊन आमदार फोडणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करा; संजय राऊतांचं अमित शाहांना चॅलेंज

देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर कशाप्रकारची भाषा वापरली. केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर ते म्हणाले की, मविआच्या लोकांना ठोकून काढा. ही कुठली भाषा आहे. राज्याचा गृहमंत्रीच गुंडगिरीची आणि ठोकशाहीची भाषा वापरत आहेत. या देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभा निवडणुकीत नागपूरमध्ये पराभव झाल्याशिवाय राहणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले.

विधानपरिषद निवडणुकीत मविआचे 20 आमदार फोडल्याची कबुली देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात दिली. देवेंद्र फडणवीस यांनी हे 20 आमदार दहीभात देऊन तर फोडले नाहीत ना? यापैकी प्रत्येक आमदाराला 50 कोटी रुपये देण्यात आले. हे पैसे देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांनी कुठून आणले? याची चौकशी गृहमंत्री अमित शाह यांनी केली पाहिजे. तरच त्यांना इतरांच्या भ्रष्टाचाराबाबत बोलण्याचा हक्क आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा