राजकीय नेत्यांना एका दिवसांत अनेक दौरे करावे लागतात. कधी मुंबईतून सुरू झालेला दौरा महाराष्ट्राच्या टोकाला म्हणजे गडचिरोलीसारख्या भागात असतो तर कधी कोकण सीमारेषेवरही जावं लागतं. त्यामुळे, विमान आणि हेलिकॉप्टरचा प्रवास त्यांच्यासाठी महत्त्वाचा असतो. त्यामुळे, हेलिकॉप्टर प्रवासात त्यांची विशेष काळजी घेतली जाते. यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेलिकॉप्टर प्रवासात काहीवेळा हेलकावे अनुभवले आहेत. आता, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र प्रवास केल्यानंतर आलेला प्रवास अनुभव अजित पवारांनी सांगितला. जिल्ह्याच्या वडलापेठ येथील सुरजागड इस्पात प्रा.लि. या आयरन स्पोंज उत्पादन करणाऱ्या कारखान्याचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला. या सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकाच हेलिकॉप्टरमधून पोहोचले होते.






अजित पवारांनी आपल्या भाषणावेळीच गडचिरोलीकडे येताना हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर पोटात गोळा आल्याचा प्रसंग सांगितला. गडचिरोली मागास दुर्गम भाग असला तरी निसर्गाने या भागाला भरभरुन दिले आहे. सुरजागड येथील खाणीत हजारो कोटी रुपयांचा लोह खनिज आहे. आधी लॉयड्स मेटल्सने काम सुरू केले आता सुरजागड इस्पात या कंपनीने कारखाना सुरु केला आहे. धर्मराव बाबा आत्राम यांचे खास कौतुक करतो, त्यांनी आपली वडिलोपार्जित दीडशे एकर जमीन या कारखान्यासाठी दिली आहे. तर, उर्वरित जागा कंपनीने खरेदी केल्याची माहिती अजित पवारांनी आपल्या भाषणात दिली. तसेच, हेलिकॉप्टरमध्ये बसून गडचिरोलीकडे येताना घडलेला प्रसंगही सांगितला.
तुम्हाला कल्पना नाही, भविष्यात किती मोठे बदल या भागात होतील. जेव्हा आम्ही येत होतो, खूप ढग होते. नागपुरातून उड्डाण केले तेव्हा बरे वाटत होते, मात्र गडचिरोलीजवळ आलो, हेलिकॉप्टर ढगात शिरले, तेव्हा माझ्या पोटात गोळा आला. मी इकडे तिकडे पाहत होतो.. सर्व घाबरून होतो, मात्र देवेंद्र फडणवीस निवांत होते. त्यांना म्हणालो पहा आपण ढगात जात आहोत. तेव्हा फडणवीस म्हणाले घाबरु नका माझे आजवर सहा accident झाले आहेत. मला मात्र कधीही काही झाले नाही. मी हेलिकॉप्टरला असलो तर कधी ही काही होत नाही. आणि तसेच झाले आम्ही सुखरूप लँड झालो, असा किस्सा अजित पवारांनी सांगितला. त्यावेळी, उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्यानंतर, त्यांच्या पूर्वजांची पुण्याई आहे ही.. असेही अजित पवारांनी म्हटले.













