अंगणातील दिडवर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला गिन्नी गवतात केलं  ठार; पूर्ण गावावर शोककळा, शेतकरी संतप्त

0

घरासमोर अंगणात खेळत असताना दिडवर्षीय चिमुकलीला बिबट्याने गिन्नी गवतात उचलून नेत ठार केले. ही घटना तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे बुधवारी (ता.१०) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. ओवी सचिन गडाख असे ठार झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.

हिवरगाव पावसा गावांतर्गत असलेल्या गडाख वस्ती येथे सचिन गडाख हे शेतकरी राहतात. बुधवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे सचिन, त्यांची पत्नी स्वाती आणि सुनील शांताराम गडाख हे घरासमोर होते. त्याच ओवी अंगणात खेळत होती. मात्र घरासमोर असलेल्या गिन्नी गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक ओवीवर हल्ला केला. तिला उचलून नेऊन धूम ठोकली.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

डोळ्यादेखत बिबट्याने ओवीला उचलून नेल्याने सर्वांनी आरडाओरड करत बिबट्याचा पाठलाग केला. मात्र गिन्नी गवत मोठे होते. त्यामुळे बिबट्या दिसत नव्हता. जवळपास पंधरा ते वीस मिनिटे शोध घेतल्यानंतर ओवी जखमी अवस्थेत आढळून आली.

त्याचवेळी देवगड विद्यालयाचे शिक्षक संतोष तातळे, मदन माने, दिनेश थोरात हे तेथून जात होते. त्यांनी जखमी अवस्थेत असलेल्या ओवीला कारमधून औषध उपचारासाठी संगमनेर येथे खासगी रुग्णालयात दाखल केले. ओवीच्या मानेला बिबट्याने गंभीर जखमा केल्या होत्या.

डाॅक्टरांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. भाग एकचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन लोंढे, उपविभागीय वनधिकारी संदीप पाटील यांनी कर्मचाऱ्यांसह रुग्णालयात धाव घेत डाॅक्टरांकडून माहिती घेतली.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

आई-वडिलांचे प्रयत्न अधुरे

आई- वडिलांच्या डोळ्यादेखतच दिडवर्षीय ओवी चिमुकलीला बिबट्याने उचलून समोर असलेल्या गिन्नी गवतात नेले होते. बिबट्याच्या तावडीतून वाचविण्याचाही आई- वडीलांनी खूप प्रयत्न केले. मात्र बिबट्याने अखेर ओवीला ठार केले. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने आई- वडिलांनी हंबरडा फोडला होता. अनेकांना अश्रू अनावर झाले होते.

गावावर शोककळा, शेतकरी संतप्त

चिमुकलीच्या मृत्यूने हिवरगाव पावसा गावावर शोककळा पसरली असून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे गडाख वस्ती परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने त्वरित याठिकाणी पिंजरा लावावा, अशी मागणी बाळासाहेब पावसे, सोमनाथ पावसे, शांताराम पावसे, महेश डेंगळे, किरण पावसे, गणेश दवंगे, संकेत पावसे, सोमनाथ भालेराव या संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या ओवीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तीच्या मानेला गंभीर जखमा होत्या. घटनास्थळी रेस्क्यू टिमला पाठवण्यात आले असून बिबट्याच्या पायाचे ठसेही घेण्यात आले. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी परिसरात पिंजरे लावण्यात आले आहे. ग्रामस्थांशी संवाद साधत जनजागृती करण्यात आली आहे.

– संदीप पाटील, उपविभागीय वनधिकारी, संगमनेर