पवार काका पुतण्यात दिलजमाई? भाजपाचा ‘तिरंगी’चा प्रयत्न; अजितदादांसाठी आत्ता रोहीत पवारांचाच पलटवार

0

लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून राज्यात भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तु तू मै मै सुरु झाली आहे. भाजपच्या काही आमदारांनीही अजित पवार गटाला सोबत घेतल्याने वाईट परिणाम झाले अशी टीका केली. तर, शिवसेना शिंदे गटाच्या वर्धापनदिनाच्या मेळाव्यात नेते रामदास कदम यांनीही ‘ते उशिरा आले असते तरी चालले असते’ असे म्हणत नाराजी व्यक्त केली. या आरोपामुळे सत्ताधारी आघाडीमध्ये अजितदादा एकाकी पडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मात्र, अजितदादा यांच्यावर होणाऱ्या या आरोपांना शरद पवार गटाचे आमदार आणि अजितदादा यांचे पुतणे रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

अजित पवार यांच्यावर नेहमी टीका करणारे शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी ट्विट केले आहे. अजितदादा हे आता एकनाथ शिंदे आणि भाजप सरकारचा भाग आहे. पण, भाजप अजित पवार यांना बळीचा बकरा बनवत आहे. भाजपच्या पराभवाला अजित पवार जबाबदार नाहीत. राज्यात तिरंगी लढत करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. अशी लढत झाली तर फायदा होईल, असे भाजप नेत्यांचे मत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

रोहित पवार यांच्यापाठोपाठ शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनीही एनडीएच्या खराब कामगिरीला भाजप नेतेच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. भाजपने संविधान बदलण्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे दलित आणि इतर समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले. भाजपने अल्पसंख्याक समाजालाही लक्ष्य केले. दलित आणि अल्पसंख्याक समाज भाजपच्या विरोधात एकवटला. तरीही भाजप आपल्या भूमिकेपासून मागे हटला नाही आणि शेवटी त्याचे नुकसान झाले. भाजपच्या पराभवात अजित पवार यांनी पूरक भूमिका बजावली असे आव्हाड म्हणाले.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

अजित पवार गटाची वेगळ्या मार्गाची धमकी

भाजप आणि आरएसएसने अजित पवार यांना सोबत घेतल्याने परिस्थिती आणखी बिघडली असे आरएसएसशी संबंधित नियतकालिकेत म्हटले आहे. या लेखानंतर भाजप नंतर शिंदे गटानेही अजित पवार गटावर हल्लाबोल सुरू केला. मात्र, अजित पवार गटाचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी भाजपला स्पष्ट इशारा दिला आहे. अजित पवार यांना टार्गेट करणे थांबवले नाही तर आम्ही वेगळी भूमिका घेण्याचा विचार करू शकतो. तर, पुण्यात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनीही एनडीएच्या अपयशाचे खापर भाजप नेत्यांवर फोडले आहे.