राष्ट्रवादीच्या मंत्र्याची मोठी मागणी, पालकमंत्रिपदातून मोकळं करा, प्रकृतीचं कारण, की राजकारण दडलंय?

0
1

गोंदिया : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी पालकमंत्रिपदावर पाणी सोडण्याची तयारी दर्शवली आहे. प्रकृतीच्या कारणास्तव आत्रामांनी गोंदियाच्या पालकमंत्रिपदातून मुक्त करण्याची मागणी केली आहे. मात्र त्यामागे राजकीय कारणं असल्याची चर्चा दबक्या आवाजात रंगली आहे.

महायुतीतल्या तिन्ही पक्षात ‘मोकळं’ करण्याच्या मागण्या

देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी घेत मोकळं करण्याची मागणी केंद्रीय नेतृत्वाकडे केली होती. त्यानंतर शिवसेनेच्या शंभुराज देसाईंनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे भार हलका करण्याची मागणी केली. आता महायुतीतल्या तिसऱ्या पक्षातल्या नेत्यानेही आपली सोडवणूक करुन मागितली आहे.

अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

प्रकृतीच्या कारणामागे राजकीय कारण दडलेलं?

दरम्यान, धर्मरावबाबा आत्राम यांच्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे प्रकृतीच्या कारणास्तव, अधिक जबाबदारी नको अशी भूमिका घेत त्यांनी पालकमंत्रिपद सोडण्याची तयारी दाखवली आहे. मात्र यामागे राजकीय कारणं असल्याचीही चर्चा आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली आणि चंद्रपूरकडे राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक लक्ष केंद्रित करायचं आहे. कारण तिथून पक्षाला जास्तीत जास्त जागा जिंकायच्या आहेत. त्यामुळे आत्रामांना पालकमंत्री पदापासून दूर राहायचं आहे.

महत्त्वाचं म्हणजे, गोंदिया भंडाराची जबाबदारी लोकसभेला अप्रत्यक्षपणे प्रफुल्ल पटेल यांच्यावर होती. पण तरी भाजपचा पराभव झाल्यामुळे पक्षाने केलेल्या सहकार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या! 

गोंदियाला नवीन नेतृत्व मिळणार

दरम्यान, धर्मरावबाबा आत्राम यांनी गोंदियाचं पालकमंत्री पद सोडण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे गोंदियासाठी लवकरच नव्या पालकमंत्र्यांची घोषणा होण्याची शक्यता आहे. प्रस्तावित मंत्रिमंडळ विस्तारावेळीच पालकमंत्रिपदही नव्या मंत्र्याकडे सोपवलं जाण्याची शक्यता आहे.

कोणाची वर्णी लागणर?

विशेष म्हणजे, गोंदियाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून पालकमंत्रिपद देण्यात आलं होतं. आता राष्ट्रवादीतून नवीन चेहऱ्याची या जागी वर्णी लागणार, की एखाद्या विद्यमान मंत्र्याकडे अतिरिक्त कारभार सोपवला जाणार, की अन्य पक्षाला गोंदियाच्या पालकत्वाची संधी मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.