क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंगचं एखादं प्रकरण समोर आलं की क्रीडाप्रेमींच्या तळपायाची आग मस्तकात जाते. अशा प्रकरणामुळे क्रिकेट बघण्याची इच्छा देखील मरून जाते. त्यामुळे आयसीसी या प्रकरणाकडे गेल्या काही वर्षात गांभीर्याने पाहात आहे. इतकंच काय कठोर कारवाई करण्यासही मागेपुढे पाहात नाही. असं असताना टी20 वर्ल्डकप स्पर्धेवर मॅच फिक्सिंगचं सावट असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, केनियाच्या माजी खेळाडूने टी20 वर्ल्डकप स्पर्धा खेळणाऱ्या युगांडाच्या खेळाडूशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण कळताच आयसीसी त्याचा तात्काळ सोक्षमोक्ष लावला आहे. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, ही घटना साखळी फेरीत गयानामध्ये घडली. केनियाच्या माजी वेगवान गोलंदाजाने युगांडाच्या खेळाडूंशी वेगवेगळ्या नंबरवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. आयसीसीचा मॅच फिक्सिंगविरोधातील कठोर कारवाई लक्षात घेत, युगांडाच्या खेळाडूने याची माहिती साईटद्वारे एसीयू अधिकाऱ्यांना दिली.
पीटीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “सदर व्यक्ती युगांडाच्या खेळाडूला आपल्या जाळ्यात ओढण्याच्या प्रयत्नात होती. कारण मोठ्या देशांच्या तुलनेत सहाय्यक देशांच्या खेळाडूंशी संपर्क साधणे सोपे आहे.परंतु या प्रकरणात ज्या खेळाडूशी संपर्क झाला त्याने तात्काळ आयसीसीला कळवले.” आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी संहितेनुसार, अशा प्रकारची माहिती आयसीसीला न देणे हा गुन्हा आहे. हे प्रकरण वेळीच कळलं आणि त्याला आळा घालण्यात यश आलं. आता आयसीसी पुढे काय पावलं उचलते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
दुसरीकडे, क्वॉलिफाय फेरीत युगांडाने चांगली कामगिरी करत टी20 वर्ल्डकप स्पर्धेत स्थान मिळवलं होतं. मात्र युगांडाचं आव्हानं साखळी फेरीतच संपुष्टात आलं आहे. युगांडाने साखळी फेरीत खेळलेले चार पैकी तीन सामने गमावले.अफगाणिस्तान, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजकडून पराभव स्वीकारावा लागला. तर युगांडाने पापुआ न्यू गिनीवर विजय मिळवून या स्पर्धेची सांगता केली.
युगांडा संघ: रॉजर मुकासा, सायमन सेसाझी (विकेटकीपर), रॉबिन्सन ओबुया, अल्पेश रामजानी, केनेथ वायस्वा, रियाझत अली शाह, दिनेश नाक्राणी, ब्रायन मसाबा (कर्णधार), जुमा मियागी, कॉस्मास क्येवुता, फ्रँक न्सुबुगा, हेन्री सेन्योन्डो, फ्रेड एनाक पटेल, बिलाल हसन