ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अंतरवली सराटीच्या वेशीवर उपोषण सुरू केलं आहे. गेल्या पाच दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे. लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे या दोघांनीही गेल्या पाच दिवसांपासून पाण्याचा थेंबही घेतलेला नाही. या पाच दिवसात सरकारचा कोणताही प्रतिनिधी या आंदोलनाकडे फिरकला नव्हता. सरकारने या आंदोलनाची दखलही घेतली नव्हती. आज पाचव्या दिवशी सरकारचे प्रतिनिधी उपोषण स्थळी आले. त्यामुळे सरकारच्या या कृतीवर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. पंकजा मुंडे यांनी ट्विट करत सरकारचे कान टोचले आहेत.
प्रा. लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले आहेत. पाणी देखील सोडले आहे. पाणी सोडल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. शासनाची भूमिका माय-बापाची असावी. सर्व वर्गांना, सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी. समान न्यायाची अपेक्षा मायबाप सरकारकडून असते. यांच्या उपोषणाकडे गांभीर्याने पहावे, असं ट्विट करत पंकजा मुंडे यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
रक्तदाब वाढला
दरम्यान, ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांचा रक्तदाब वाढला असल्याची माहिती डॉक्टर अनिल वाघमारे यांनी दिली आहे. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी त्यांची आरोग्य तपासणी केली. यावेळी लक्ष्मण हाके यांचा रक्तदाब आणि शुगर वाढल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यांना उपचाराची गरज असून हाके यांनी उपचार घेण्यास नकार देत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
राज्यपालांची लेखी हमी हवी
लक्ष्मण हाके यांचं हे उपोषण अंतरवली सराटीच्या वेशीवरील वडीगोद्री गावात सुरू आहे. हाके हे मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य आहेत. त्यांनी उपोषण सुरू केल्यानंतर वडीगोद्रीत ओबीसींचे नेते, कार्यकर्ते आणि सामान्य लोक एकवटताना दिसत आहे. आमच्या आरक्षणाला धक्का लागू नये. आमच्या आरक्षणात कुणालाही वाटेकरी करू नये ही आमची मागणी आहे. जोपर्यंत राज्यपालांची लेखी हमी मिळत नाही, तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही, असं हाके यांनी म्हटलंय. मराठ्यांच्या स्वतंत्र आरक्षणाला आमचा कोणताही विरोध नाही. पण आमच्या आरक्षणात कुणीही वाटेकरी नको असं त्यांचं म्हणणं आहे.