भाजपकडून उमेदवारीमुळेच पंकजाताईंचा पराभव; अपक्ष  नक्कीच विजयी झाल्या असत्या, ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य

0

बीड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव हा केवळ त्या भाजपच्या उमेदवार होत्या म्हणून झाला असल्याचे वक्तव्य ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी केलं आहे. पंकजा मुंडे या जर अपक्ष उमेदवार असत्या तर त्यांना दलित मुस्लिम आणि गरीब मराठा समाजाने सुद्धा मतदान केलं असते. त्यामुळं या निवडणुकीत त्यांचा विजय झाला असता असं  दीपक केदार यांनी व्यक्त केलं.

बीडमध्ये अटीतटीच्या लढतीत बजरंग सोनवणेंचा विजय

बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला आहे. अत्यंत अटितटीच्या या लढतीत सोनवणे यांनी बाजी मारली आहे. संपूर्ण राज्याच या निवडणुकीकडे लक्ष लागलं होतं. कारण या निवडणुकीच्या निमित्तानं दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पंकडा मुंडे यांच्यासाठी भाजपच्या बड्या नेत्यांनी जाहीर सभा घेतल्या होत्या. मात्र, मतदारांनी बजरंग सोनवणे यांच्याच झोळीत मतांचं दान टाकल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, पंकजा मुंडे या जर भाजपकडून लढल्या नसत्या तर त्यांचा विजय झाला असता असं वक्तव्य दीपक केदार यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तळात चर्चा सुरु आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

बीड जिल्ह्यात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

दरम्यान, राज्यात काहीतरी मोठी घटना घडणार आहे, हे देवेंद्र फडणवीस यांना माहीत असल्यामुळेच त्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली असल्याचा आरोप सुद्धा दीपक केदार यांनी केला आहे. बीड जिल्ह्यात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा काही कर्मठ विघटनवादी विचारांचा अजेंडा आहे. त्यामुळं आम्ही जातीय सलोखा टिकवण्याची मागणी करत असल्याचे दीपक केदार म्हणाले.