राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड कऱण्यात आली आहे. यानंतर पुण्यात त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. सुनेत्रा पवार यांनी यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. मला राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली तर त्याचं सोनं करेन अशी इच्छा यावेळी त्यांनी व्यक्त केली. तसंच निलेश लंके यांनी गुंड गजा मारणेची भेट घेतल्याच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवारांचा उल्लेख करत टीका केली.
राज्यसभेवर बिनविरोध वर्णी लागलेल्या सुनेत्रा पवार यांचा पुण्यात सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी डीजे वाजवत, गुलाल आणि फुलांची उधळण करत सुनेत्रा पवार यांचं स्वागत केलं. पक्ष कार्यालयसमोर असलेल्या केसरी वाड्यातील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा सत्कार करण्यात आला.
“मला राज्यसभेची उमेदवारी दिली त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देते. मला याठिकाणी खासदार म्हणून उपस्थित होण्यासाठी सर्वांचं पाठबळ मिळालं. माझी निवड होण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचे आभार मानते. माझा स्वागत सत्कार सोहळा ठेवला आहे. हा उत्साह माझ्यासाठी पुढील कामासाठी ऊर्जा ठरणार आहे. बारामती मतदारसंघात फिरत असताना अनेक गोष्टी जाणवल्या. बारामती विधानसभा मतदार संघाप्रमाणे संपूर्ण लोकसभा मतदार संघाचा विकास करायचा आहे,” असं सुनेत्रा पवार यांनी सांगितलं आहे.
बारामतीत का पराभव झाला यावर आत्मचिंतन करत आहोत. जनतेने कौल दिला त्याचा स्वीकार करते. येणाऱ्या निवडणुकीत असे घडणार नाही असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला. कुणाचीही बारामतीत लढायची इच्छा असू शकते. शेवटी जनता ठरवेल काय करायचे ते असंही त्या म्हणाल्या. केंद्रात मंत्रिपद मिळाल्यास संधीचे सोनं करणार असंही त्या म्हणाल्या.
निलेश लंकेंचा गुंड गजा मारणेच्या हस्ते सत्कार झाल्याप्रकरणीही त्यांनी टीका केली. गजा मारणेला पार्थ पवार भेटले तेव्हा रान उठवलं गेलं. आज कोणी भेटलं असेल तर त्यांना माहिती असायला हवं आपण कुणाला भेटतोय ते असा टोला त्यांनी लगावला.