छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रिधिमा पंडित ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मात्र, आता तिचं चर्चेत असण्याचं कारण ती लोकप्रिय भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिलसोबत लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. नुकतीच एक रिपोर्ट समोर आली असून त्यात दावा करण्यात आला आहे की रिधिमा ही यंदाच्या वर्षी डिसेंबरमध्ये शुभमन गिलसोबत लग्न करणार आहे. त्यावर आता रिधिमानं तिची प्रतिक्रिया दिली आहे.






‘टेलीचक्कर’ च्या रिपोर्टनुसार, रिधिमा पंडितनं नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला. त्यात तिनं म्हटलं की ‘मला अनेक पत्रकारांचे फोन येत होते त्यामुळे माझी झोप उडाली. ते माझ्या लग्नाविषयी माझ्याकडून माहिती जाणून घेत होते, पण कोणतं लग्न? मी लग्न करत नाही आहे आणि जर माझ्या आयुष्यात इतकं महत्त्वाचं काही होत असेल तर मी स्वत: समोर येऊन याविषयी घोषणा करेनं. या बातमीत थोडंही तथ्य नाही.’ दरम्यान, रिधिमाचा हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दिसत नाही आहे.
दरम्यान, ज्या चर्चा सुरु होत्या त्यात असे म्हटले होते की डिसेंबर 2024 मध्ये राजस्थानच्या जयपुरममध्ये रिधिमा आणि शुभमन हे सप्तपदी घेणार आहेत. पण त्यांना त्यांच्या नात्याविषयी कोणालाही काही अद्याप सांगायचे नाही. दरम्यान, त्या रिपोर्ट्समध्ये असे देखील म्हटलं आहे की त्या लग्नात कोणालाही फोन किंवा मीडिया कव्हरेज करण्यास परवानगी नसेल.
दरम्यान, रिधिमानं जरी तिच्या आणि शुभमनच्या लग्नाच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली असली तरी देखील शुभमन गिलनं यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सगळ्यांचे लक्ष हे आता शुभमन यावर काय प्रतिक्रिया देतो याकडे लागले आहे. कारण या आधी देखील चर्चा सुरु होती की शुभमन गिल हा लोकप्रिय क्रिकेट पटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरला डेट करत आहे. त्यावेळी देखील शुभमननं कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती.
रिधिमा पंडितच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिनं ‘बहू हमारी रजनीकांत’ आणि ‘खतरा खतरा खतरा’ सारख्या छोट्या पडद्यावरील शोमध्ये काम केलं आहे. त्याशिवाय रिधिमा ही ‘बिग बॉस ओटीटी’ च्या पहिल्या सीझनमध्ये देखील दिसली होती.










