गुरुवारी इंग्लंड विरूद्ध ओमान यांच्यात वर्ल्डकपच्या स्पर्धेमध्ये सामना रंगला होता. यावेळी इंग्लंडच्या टीमने अक्षरशः ओमानचा धुव्वा उडवला. अवघ्या 19 बॉल्समध्ये इंग्लंडने ओमानचा पराभव केला. जॉस बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या टीमने ओमानला 47 रन्सवर ऑलआऊट केलं. यानंतर इंग्लंडच्या टीमने अवघ्या 3.1 ओव्हरमध्ये लक्ष्य पूर्ण केलं. दरम्यान या विजयामुळे इंग्लंडच्या टीमची सुपर 8 मध्ये प्रवेश करण्याची शक्यता वाढली आहे.
इंग्लंडचा ओमानवर मोठा विजय
इंग्लंडच्या पहिल्या सामन्यात पावसाने खोडा घातला होता. यानंतर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पराभव केला. त्यामुळे या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी इंग्लडच्या टीमला मोठ्या फरकाने विजय मिळवून नेट रनरेट निश्चित करणं आवश्यक होतं. ओमानविरूद्ध जॉस बटलरने टॉस जिंकून ओमानला प्रथम फलंदाजी करण्याचं निमंत्रण दिलं. यानंतर मार्क वूड आणि जोफ्रा आर्चर यांनी मिळून ओमानच्या आघाडीच्या फलंदाजांना माघारी धाडलं. पॉवरप्लेमध्येच ओमान टीमने केवळ 25 धावांत 4 विकेट गमावल्या. त्यानंतर ओमानची संपूर्ण टीम अवघ्या 47 रन्सवर पव्हेलियनमध्ये परतली.
19 चेंडूंमध्ये केला ओमानचा पराभव
ओमानने दिलेल्या 48 रन्सच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी जेव्हा इंग्लंडची टीम मैदानात उतरली त्यावेळी ओपनर फिल सॉल्टने पहिल्या 2 चेंडूंवर सिक्स ठोकले. त्यानंतर मात्र त्याने त्याची विकेट गमावली. यानंतर विल जॅक फलंदाजीला आला पण तो पुन्हा एकदा फ्लॉप ठरला आणि 7 चेंडूत 5 धावा करून तो बाद झाला. जॅक आऊट झाल्यानंतर कॅप्टन बटलरने कमांड हाती घेतली 300 च्या स्ट्राईक रेटने अवघ्या 8 बॉल्समध्ये 24 रन्स केले. यावेळी अवघ्या 19 बॉल्समध्ये 2 विकेट्स राखून लक्ष्याचा पाठलाग केला.
इंग्लंडची टीम करणार का सुपर 8 मध्ये प्रवेश?
इंग्लंडच्या टीमचा नेट रन रेटशी (NRR) काहीसा चांगला नव्हता. यावर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड म्हणाला होता की, इंग्लंडला या स्पर्धेतून बाहेर काढण्यासाठी ऑस्ट्रेलियाची टीम स्कॉटलंडकडून पराभूत होण्याचा करण्याचा विचार करू शकते. दरम्यान इंग्लंडनेही त्यांच्या खेळाने ऑस्ट्रेलियाला प्रत्युत्तर दिलं आहे. या सामन्यानंतर, इंग्लंडची टीम स्कॉटलंडपेक्षा 2 गुणांनी मागे आहे. परंतु नेट रनरेटच्या बाबतीत ती पुढे गेली आहे. स्कॉटलंडचं NRR +2.164 आहे, तर इंग्लंडचा +3.081 आहे. आता सुपर-8 मध्ये जाण्यासाठी त्यांना नामिबियाला कोणत्याही परिस्थितीत पराभूत करावे लागणार आहे.