दिल्लीत महाराष्ट्राची महत्त्वाची भूमिका; पक्ष फुटीचाच मुद्दा पुन्हा चर्चेत; विधानसभेत मात्र यांनाच पुन्हा संधी: चोरमारे

0

लोकसभेची निवडणूक असली तरी या निवडणुकीत सर्वात प्रभावी मुद्दा होता तो शिवसेना आणि राष्ट्रवादीत पडलेली फूट. भाजप किंवा एकनाथ शिंदे यांनी हा मुद्दा दुर्लक्षित ठेवता येईल तेवढा ठेवायला पाहिजे होता. पण मोदी-शाहांपासून फडणवीसांपर्यंत या सर्वांनी हा मुद्दा चर्चेत ठेवला. म्हणजे जो मुद्दा प्रभाव पाडू शकतो, तो दुर्लक्षित करायला हवा होता. पण त्यांनी तसं केलं नाही. नागरिक आणि शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर या फुटीवर त्यांच्या मनात संताप होता त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसणार आहे त्या अर्थाने महाराष्ट्र दिल्लीच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. असा मोठा दावा ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी केला आहे.

“राम मंदिर झालं याबाबत दुमत नाही. कायदेशीर मार्गाने झालं ते चांगलं केलं. पण हे सांगतात आम्ही आश्वासन पूर्ण केलं. पण या आश्वासनाचा सामान्य माणसांचा संबंध नाही. तुमच्या सांस्कृतिक अजेंड्यावरील विषय पूर्ण केले. लोकांचे विषय पूर्ण केले नाही. महागाई वाढली. शिक्षण महागलं. शेतकऱ्यांना दिलासा नाही. शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देतात आणि वेगवेगळ्या करातून त्यांच्या खिशातून ६० हजार रुपये वर्षाला काढून घेता हे सुद्धा शेतकऱ्यांना पटलेलं आहे. त्यांची ही योजनाही यशस्वी झाली नाही”, असं विजय चोरमारे म्हणाले.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

‘विधानसभेत महाराष्ट्रात मविआचं सरकार येणार’

“लोकसभा निवडणुकीचा काहीही लागू दे, मोदींना बहुमत मिळू दे, किंवा बाहेरच्या पक्षाच्या मदतीने सत्तेवरून येऊ दे. काहीही होऊ दे पण महाराष्ट्रात विधानसभेला महाविकास आघाडीचं सरकार येण्यापासून कोणी रोखू शकत नाही. फक्त ते एकत्र राहिले पाहिजे. जागा वाटप व्यवस्थित केलं पाहिजे. एवढं झालं तर कुणीही महाविकास आघाडीला रोखू शकत नाही. महाविकास आघाडीचं कॉम्बिनेशन घट्ट आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं ग्रामीण व्होट बँक आणि शिवसेनेची शहरी व्होट बँक यामुळे महाविकास आघाडीचं सरकार येईल”, अशी भविष्यवाणी विजय चोरमारे यांनी वर्तवली.

या मुद्द्याभोवतीच निवडणूक फिरत राहिली’

“शिवसेना आणि राष्ट्रवादीत फुट पडल्याने या निवडणुकीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळेल असं वाटत होतं. पण मनोज जरांगे पाटील आले आणि त्यांनी महाराष्ट्र ढवळून काढला. त्यामुळे पक्ष फुटीचा मुद्दा मागे पडला. या निवडणुकीत त्याचा प्रभाव पडणार नाही असं वाटत होतं. पण प्रत्यक्ष निवडणुकीत तसं झालं नाही. हा मुद्दा निवडणुकीत चर्चेत आला आणि या मुद्द्याभोवतीच निवडणूक फिरत राहिली. त्यामुळे भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला आणि एनडीएला फटका बसलेला दिसेल”, असा दावा विजय चोरमारे यांनी केला.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

“लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया, प्रचार, सभा आणि एकूण मतदान पाहिलं तर जनमानसाचा अंदाज घेतल्यावर असं सांगता येतं की ४ जूनला दिल्लीत जे राजकारण होणार आहे, त्यात महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहणार आहे. त्याचं कारण म्हणजे उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत. राज्यात गेल्यावेळी एनडीएला ४३ जागा मिळाल्या होत्या. म्हणजे महायुतीच्या ४२ जागा होत्या. १ एक जागा नवनीत राणांची होती. त्या महाविकास आघाडीमुळे निवडून आल्या. पण आल्या आल्या त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे ४२ जागा त्यांच्या होत्या. म्हणजे ४८ जागांपैकी पाच जागा महाविकास आघाडीला होती आणि एक जागा एमआयएमची होती. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर महायुतीने राज्यात यश मिळवलं होतं. तिथे एनडीएला फार मोठा फटका बसणार आहे. इथे महाविकास आघाडीला अधिक चांगल्या जागा मिळणार आहे”, असा दावा विजय चोरमारे यांनी केला.

‘भाजपचं ४०० पार राहू द्या, पण…’

“किमान ३० जागा महाविकास आघाडीला मिळतील. म्हणजे भाजपला २५ जागांचा फटका बसणार आहे. महाराष्ट्रात २५ जागांचा फटका म्हणजे एनडीए ३०० वरून २७५ वर येते. हेच गणित कर्नाटकात, बिहारमध्ये किती फटका बसू शकतो, भाजपचं ४०० पार राहू द्या. पण ३००च्या खाली येण्याचा पहिला धक्का महाराष्ट्र देणार आहे”, असं मोठं वक्तव्य विजय चोरमारे यांनी केलं.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

“तोडफोडीचं कारण एक आहे. फक्त तेच नाही. १० वर्षापासून मोदींच्या नेतृत्वात सत्ता आहे. या सरकारने अनेक अश्वासने दिली. एकही आश्वासन पूर्ण केलं नाही. फक्त दहा वर्ष गप्पा मारल्या. महागाई कमी झाली नाही. गॅस सिलिंडरचा दर कुठे गेला हे लोकांसमोर आहे. यांच्याकडून काही घडलं नाही हे लोकांनी पाहिलं आहे. यांना फक्त यांचा सांस्कृतिक अजेंडा राबवण्यासाठी सत्ता हवी होती. राम मंदिर केलं. राम मंदिर ही काही जनतेची मागणी नव्हती. राम मंदिर हा भाजपचा अजेंडा होता. संघाचा विषय होता. ३७० कलम ही काही जनतेची मागणी नव्हती. लोकांनी ३७० कलम आणि राम मंदिराच्या नावाने मतदान केलं नाही. असं असतं तर यांना ९०-९५मध्येच बहुमत मिळायला हवं होतं ना”, असं विजय चोरमारे म्हणाले.