बारामतीचं शीतयुद्ध कोण जिंकेलं? बारामतीत लोकसभा निकालाआधी 2 भावांमध्ये जुंपणार? ‘यंग ब्रिगेड’ तयारीला

0

राज्यातील लोकसभा निवडणुकीचं वारं आता शांत झालंय. राज्यातील संपूर्ण पाच टप्प्यातील निवडणूक पार पडली आहे. यंदाच्या निवडणुकीत सर्वात हायप्रोफाईल सीट ठरलीये ती बारामती… बारामतीत नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगला होता. यावर आता कोणता निकाल लागतोय? यावर सर्वांचं लक्ष लागलंय. अशातच आता लोकसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच बारामतीत पवारांच्या दोन्ही गटातील यंग ब्रिगेड पुढील विधानसभेसाठी आत्तापासूनच तयारीला लागली आहे. चुलत्या पुतण्यानंतर आता बारामतीत दोन भावांमध्ये सामना रंगण्याची शक्यता आहे.

चुलत्या पुतण्यानंतर आता दोन भावांमध्ये जुंपणार?

एकीकडे राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाकडून युगेंद्र पवार यांनी जनता दरबाराचे आयोजन करत नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा धडाका लावला आहे तर दुसरीकडे आज गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे पुत्र जय पवार यांनीही राष्ट्रवादी भवनात जनता दरबार घेत युगेंद्र यांना प्रत्युत्तर दिलेय. त्यामुळे आता चुलत्या पुतण्यांच्या राजकीय धूलवडीनंतर या दोन चुलत भावांच्या जनता दरबाराची बारामतीत जोरदार चर्चा सुरू आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

अजितदादांवर थेट टीका करणारे युगेंद्र पवार बारामतीत जनता दरबार घेत राजकारणात सक्रिय झाले झाल्याने ते विधानसभा निवडणूक लढणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय. मी याबाबत विचार केला नाही. मला लोकांची कामं करायची आहेत, अजून मला वेळ आहे, असं म्हणत युगेंद्र पवार यांनी उत्तर देणं टाळलं होतं. मात्र, आता थेट जनता दरबार भरवल्याने आता युगेंद्र पवार सुप्रिया सुळेंची बाजू भक्कमपणे मांडत असल्याचं दिसतंय.

दरम्यान, जय पवार लोकसभा निवडणुकीपासून सक्रिय झाले आहेत. बारामती लोकसभेसाठी अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली असताना जय पवार यांनी अचानक अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. अजित पवार यांचे मोठे चिरंजीव पार्थ पवार यांच्यासोबतच छोटे चिरंजीव जय पवारही आता बारामतीत सक्रिय झाले असल्याने आता बारामतीचं शीतयुद्ध कोण जिंकणार? यावर सध्या जोरदार चर्चा होताना दिसते.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा