सांगलीत ‘पाटील’ पुन्हा भिडले! कदम खुल्लं बोला! नथितून तीर मारू नका? संजयकाका अन् विशाल पाटील वाकयुद्ध

0

सांगलीत लोकसभा निवडणुकीत 3 पाटलांमध्ये चुरशीची लढत झाली. तिकीट वाटपापासून मतदान होईपर्यंत सांगलीची निवडणूक चर्चेत राहिली होती. पण, निवडणुकीनंतरही तू-तू मैं-मैं थांबण्याचं नाव घेत नाही. खासदार संजयकाका पाटील यांनी माजी मंत्री, काँग्रेसचे आमदार विश्विजित कदम यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. त्यानंतर कदम यांच्यासाठी मित्र विशाल पाटील मैदानात उतरले असून त्यांनी संजयकाका पाटील यांना जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे.

संजयकाका पाटील काय म्हणाले?

“माझे नशिब उलटे-सुलटे करणारा अजून कोणी जन्माला आला नाही. माझा भविष्य घडविणारी जिल्ह्यातील जनता आहे. पाकिटाचं काम करणाऱ्यांना स्पष्टपणे सांगतो, माझं नशिब बदलण्याची क्षमता असलेला अजून जन्माला आला नाही. तसेच, गुलदस्त्यात कशाला विश्वजित कदम यांनी हिंमत असेल, तर विशाल पाटील यांचं काम केलंय, हे सांगावं. नथितून तीर मारण्यात गरज काय? महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विश्वासघात करणं ही भूमिका बरोबर नाही,” असा हल्लाबोल संजयकाका पाटील यांनी विश्वजित कदम यांच्यावर केला आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

यानंतर विश्वजित कदम यांच्या बाजूनं विशाल पाटील खिंड लढवत संजयकाका पाटील यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. “संजयकाकांचा पराभव होणार हे कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे कार्यकर्ते सोडून जाण्याच्या तयारीत आहे. पण, कार्यकर्त्यांना थांबवण्यासाठी आणि जाता-जाता पत्रकार परिषद घेत कुणावर तरी खापर फोडण्याचं काम संजयकाकांनी केलंय, असा टोला विशाल पाटील यांनी लगावला आहे.”विश्वजित कदम एकटे नाहीत. त्यांच्या पाठीमागे सांगलीतील संपूर्ण वसंतदादा प्रेमी जनता आहे. विश्वजित कदम महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आहेत. ते काँग्रेसचे भविष्य असून पक्षाशी पूर्णपणे प्रामाणिक आहेत. महाविकास आघाडीचा विजय झाला पाहिजे. भाजपच्या पराभवासाठी ‘इंडिया’ आघाडीतील प्रत्येक घटकानं प्रामाणिकपणे काम केलंय. तसेच, पूर्ण मतदान माझ्याकडे वळलं आहे.” असा विश्वास विशाल पाटील यांनी व्यक्त केला.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

“विश्वजित कदम यांनी घेतलेला निर्णय चार तारखेला निश्चित दिसेल, विश्वजित कदम आणि त्यांच्या मतदारांनी कोणाला पाठिंबा द्यावा, हा प्रश्न संजयकाका यांच्याशी निगडीत नाही. संजयकाका वैफल्यग्रस्त झाल्यानं काँग्रेसच्या नेत्यांवर टीका करत आहेत. कारण, भाजपचं मतदान मिळालेलं नाही, हे त्यांना माहितेय. त्यामुळे काँग्रेसनं मदत करावी, अशी अपेक्षा त्यांनी का ठेवावी? माझे दिलदार मित्र माझ्या मदतीला येणार होते आणि आलेले आहेत. हे चार तारखेला दिसेल,” असं म्हणत विशाल पाटील यांनी संजयकाका पाटील यांचा समाचार घेतला आहे.