लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यामध्ये आज (13 मे) महाराष्ट्रातील 11 जागांसाठी मतदान पार पडले. यामध्ये पुणे जिल्ह्यातील पुणे लोकसभा, मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचा सुद्धा समावेश होता. या तिन्ही मतदारसंघांमध्ये आज मतदान किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले. पुण्यामध्ये सुरुवातीपासूनच राजकीय गणितीय जुळवणाऱ्या लोकांसाठी पुण्यातील राजकीय लढत कायमच कसोटीची राहिली आहे. पुण्यामध्ये प्राबल्य कुणाचे आणि बालेकिल्ला कोणाचा यावरती किमान शेकडो व्हिडिओ आणि हजारो बातम्या झाल्या असल्या तरी आज पुणेकरांनी खरंच डोक्याचा कीस पाडण्याचं काम केलं. पुण्यामधील सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेली मतांची कमी टक्केवारी आणि बालेकिल्लातील मताधिक्य या सर्व गणितांची जुळवाजवळ करण्यात रात्री उशिरापर्यंत सर्वच राजकीय विश्लेषकांच्या डोक्याचा कीस पडला खरंच पुणेकर कोणाच्या पारड्यात विजय टाकतील याचा अंदाज 4 जूनपर्यंत लावणे अशक्यच म्हणावे लागेल.






सहापर्यंत पुणे लोकसभा मतदारसंघांमध्ये 50.50 टक्के मतदानाची नोंद
सायंकाळी सहा वाजेपर्यंत पुणे लोकसभा मतदारसंघांमध्ये 50.50 टक्के मतदानाची नोंद झाली. सायंकाळी मतदान पार पडल्यानंतर पुणे लोकसभेतील दोन्ही उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांनी विजयाचा दावा केला आहे. काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्यापासूनच लोकसभा निवडणुकीमध्ये कसबा आणि कोथरूड या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये कायम विरोधात मते असल्यामुळे दुर्लक्ष करण्याचे काम केले जात त्यामुळे या भागात पडणारी लोकसभेची मते ही सहसा 80 टक्के भारतीय जनता पक्षाच्या बाजूने पडलेली आजपर्यंत पाण्यात मिळाले आहे. परंतु यंदा लोकसभेचे बिगुल वाजले त्यावेळेस कसब्यातून काँग्रेसने दिलेली उमेदवारी आणि कोथरूडच्या चौका चौकात महाविकास आघाडीचे असलेले पदाधिकारी यामुळे खरंच वाढलेले मतदान कुणाचं आणि कुणाच्या पारड्यात याचा अंदाज बांधणे शक्य होत नाही. इतकेच नव्हे तर पुण्यामध्ये उत्साही कार्यकर्त्यांनी मुरलीधर मोहोळ यांच्या समर्थनार्थ खासदार म्हणून बॅनरबाजी सुद्धा केली आहे. त्यामुळे पुण्याचा खासदार कोण? याचे उत्तर 4 जून रोजीच मिळणार आहे. मात्र, पुण्यामध्ये दोन मतदारसंघात वाढलेली टक्केवारी कोणाला झटका देणार याची चर्चा मात्र रंगली आहे.
शिरूर लोकसभेमध्ये 47.50 टक्के मतदानाची नोंद झाली, तर मावळ लोकसभेमध्ये 52.30 टक्के मतदानाची नोंद झाली. दरम्यान, अंतिम आकडेवारी आल्यानंतर यामध्ये आणखी बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 2019 च्या तुलनेत विचार केल्यास शिरूर आणि मावळ लोकसभा तुलनेत पुणे लोकसभेला मतदानाचा आकडा काहीसा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाढलेल्या मतदानाचा नेमका कोणाला फायदा होणार आणि कोणाला झटका बसणार? याची चर्चा रंगली आहे.
मावळ आणि शिरूर घसरलेल्या टक्केवारीची चिंता
2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुण्यामध्ये 49. 49 टक्के मतदानाची नोंद झाली होती. 2014 च्या तुलनेमध्ये त्यामध्ये जवळपास 4.22 टक्के मतदानाची घसरण झाली होती. मात्र, यावेळी मतदानाची वाढ होण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे सर्वाधिक लक्ष लागून राहिलेल्या मावळ आणि शिरूर लोकसभेमध्ये मात्र घसरलेल्या टक्केवारीने मात्र नक्कीच चिंता पसरली आहे. 2019 मध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी 59.44 टक्के मतदानाची नोंद झाली होती. मात्र यावेळी सायंकाळी सहा वाजेपर्यंत 47.50 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. यामध्ये आणखी वाढ अपेक्षित असली तरी हा आकडा 2019 च्या तुलनेमध्ये कमी राहण्याची चिन्हे आहेत.
मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये 52.30 टक्के मतदानाची नोंद झाली असली, तरी 2019 मध्ये या ठिकाणी 59.59 टक्के मतदानाची नोंद झाली होती. त्यामुळे हा आकडा सुद्धा गाठण्याची शक्यता कमी आहे. या घसरलेल्या आकडेवारीने दोन मतदारसंघात आणि पुण्यामध्ये वाढलेल्या टक्केवारीचा कोणाला फायदा आणि तोटा होणार याचे उत्तर आता चार जून रोजी मिळणार आहे. शिरूरमध्ये अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील अशी थेट लढत होत आहे, तर मावळमध्ये श्रीरंग बारणे विरुद्ध संजोग वाघेरे यांच्यामध्ये लढत होत आहे. मावळमध्ये शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक असा लढा होत असून शिरूरमध्ये पाटील यांनी घड्याळ हाती घेतलं आहे, तर अमोल कोल्हे तुतारीवर रिंगणात आहेत.











