महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या प्रकरणावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि नाव प्रकरणावर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलीय. याच याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राज्यात आता केवळ पाचव्या टप्प्यासाठी मतदान राहिलं आहे. येत्या 20 मे ला त्यासाठी मतदान होणार आहे. यावेळी एकूण 13 जागांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे आता जोरदार प्रचाराची रणधुमाळी बघायला मिळणार आहे. अशावेळी आता सुप्रीम कोर्टात राष्ट्रवादीच्या याचिकांवर महत्त्वाची सुनावणी होणार आहे.






राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत उद्या सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाकडून प्रकरण लिस्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात दुपार १२ नंतर सुनावणी होण्याची शक्यता आहे. या सुनावणीत काय युक्तिवाद होतो ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षात मोठं बंड पुकारल्यामुळे पक्षात फूट पडली आहे. अजित पवार हे राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. तर शरद पवार यांनी सत्तेत न जाण्याचा निर्णय घेतलाय. याउलट शरद पवार यांनी अजित पवार यांच्याविरोधात कायदेशीर लढाई लढण्याचा निर्धार केलाय. त्यामुळे वर्षभरापासून दोन्ही पवार काका-पुतण्यामध्ये राजकीय आणि कायदेशीर संघर्ष बघायला मिळत आहे.
शिवसेनेच्या सुनावणीचं काय?
एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस प्रकरणावर उद्या सुनावणी होणार आहे. पण शिवसेनेच्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. शिवसेना आमदार अपात्र प्रकरण, तसेच शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या म्हणजे 14 मे ला सुनावणी होणार होती आणि निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्या प्रकरणी ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर 17 मे ला सुनावणी होणार होती. मात्र आता या दोन्ही प्रकरणाच्या सुनवण्या जुलै महिन्यात होण्याची शक्यता आहे.
या आठवड्यात सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे ब्राझील दौऱ्यावर जाणार असल्याने ते कामकाजात नसतील. या दोन्ही प्रकरणाच्या सुनावण्या CJI यांच्या पिठासमोर होत्या. मात्र ते सुट्टीवर असल्याने या सुणावण्या होणार नाहीत, अशी माहिती समोर येत आहे. मागच्या अनेक महिन्यांपासून या प्रकरणी सुनावणी झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणी निकाल विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लागण्याची शक्यता आहे.











