पुणे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नावे बोगस मतदान; मतदान अधिकाऱ्यांवर दमदाटीचाही आरोप

0
2

पुणे: लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. यावेळी पुणे मतदारसंघात बोगस मतदान झाल्याचा आरोप केला जात आहे. मतदाराच्या नावाने बोगस व्यक्तीने मतदान करुन स्वाक्षरी केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नावे हे बोगस मतदान केल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याशिवाय शिरुर लोकसभा मतदारसंघातही मतदारांच्या नावे बोगस मतदान झाल्याची माहिती आहे.

काय आहे नेमका प्रकार?

साडे अकरा वाजताच्या सुमारास अरविंद शिंदे हे मतदान करायला गेले. तिथे वोटर आयडी कार्ड दिलं असता त्यांच्या नावावर रेड लाइन मारली होती आणि त्यांचं मतदान झालेलं आहे, असं त्यांना सांगण्यात आलं. तसेच, जो आधार नंबर लिहिला होता त्याचे अखेरचे चार आकडेही वेगळे होते. इतकंच नाही तर अंगठ्याचा शिक्काही दुसऱ्याचा असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

अधिक वाचा  पुण्यात १४ वर्षात नदीची वहन क्षमता घटल्याने पुराचा धोका ४०% नी वाढला

याबाबत अरविंद शिंदे यांनी मतदान अधिकाऱ्यांवर दमदाटी केल्याचा आरोपही केला आहे. तसेच, त्यांनी बॅलेट पेपरवर टेंडर व्होट केल्याचं सांगितलं. तसेच, त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारही दाखल केली आहे.

शिरुरमध्येही बोगस मतदान

शिरुर लोकसभा मतदारसंघातील राजगुरु नगर येथील हुतात्मा राजगुरु विद्यालय या मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याचं समोर आलं आहे. मतदार मतदानाला येण्यापूर्वीच त्यांचं मतदान झाल्याची धक्कादायक बाब घडली आहे. यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.