…‘’तर तुम्ही नकली शिवसेना चालवत आहात, खरी शिवसेना शिंदेंकडेच आहे” ; शाहांचा ठाकरेंवर हल्लाबोल

0

“उद्धव ठाकरे सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिम्मत करू शकतात का ? हिंमत नसेल तर तुम्ही नकली शिवसेना चालवत आहात, खरी शिवसेना शिंदेंकडेच आहे”, असं म्हणत गृहमंत्री अमित शाह यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ अमित शाह यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात सभा घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार आणि काँग्रेसवर निशाणा साधला.

काश्मीरच्या लाल चौकात जाणे अवघड होते

अमित शाह म्हणाले, 5 ऑगस्ट 2019 रोजी मोदीजींनी आर्टिकल 370 हटवले. त्यामुळे काश्मीर कायमस्वरुपी भारतात आला आहे. मी उद्धव ठाकरेंना विचारू इच्छितो की, तुम्ही मुख्यमंत्री बनण्यासाठी ज्यांच्या पायाशी पडलात ती काँग्रेस पार्टी आणि शरद पवार काय करत होते? काँग्रेस पक्ष आणि शरद पवार 370 हटवण्यासाठी विरोध करत होते. राहुलबाबा संसदेत उभे राहिले आणि म्हणाले 370 हटवू नका. मी विचारलं का हटवायचे नाही, तर म्हणाले काश्मीरमध्ये रक्ताची नदी वाहेल. 5 वर्ष झाले रक्ताची नदी सोडा कोणाची विरोध करण्याची देखील हिंमत झाली नाही. ही नरेंद्र मोदी सरकार आहे. काश्मीरच्या लाल चौकात जाणे अवघड होते, आज तिथे कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी केली जाते, असंही शाह यांनी नमूद केलं.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

मनमोहनसिंग मौन राखत दिल्लीत बसत होते

पुढे बोलताना शाह म्हणाले, मी आज उद्धवजींना विचारू इच्छितो की, तुम्हाला मुख्यमंत्रिपद हवे आहे की, आर्टीकल 370 हटवणाऱ्याला विरोध करणारी काँग्रेस-राष्ट्रवादी पाहिजे. जे राहुल गांधी आणि शरद पवारांना शरण जातील, ते महाराष्ट्राचा गौरव सांभाळू शकणार नाहीत. 10 वर्षात सोनिया-मनमोहन यांची सत्ता होती. पाकिस्तानी लोक देशात घुसत होते. मौनीबाबा मनमोहनसिंग मौन राखत दिल्लीत बसत होते. त्यांना व्होट बँकेची चिंता होती. त्यांची व्होट बँक कोण आहे माहिती आहे ना?

मोदीजींनी पाकिस्तानात घुसून आंतकवाद्यांचा खात्मा केला. छत्तीसगढमध्ये भाजपची सत्ता आली, 29 नक्षलवादी मारले गेले. काँग्रेसवाले म्हणतात, फेक एन्काऊंटर आहे. मोदीजींनी 5 वर्षात राम मंदिराची केस जिंकली आणि मंदिरही बांधून दाखवले.उद्धव ठाकरेंची व्होट बँकही काँग्रेसप्रमाणे झाली आहे, असा दावाही अमित शाह यांनी केला.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता