माढा मतदारसंघातून उमेदवारी डावलल्यानंतर मोहिते-पाटलांनी भाजपविरोधात बंड पुकारत ‘तुतारी’ हाती घेतली. धैर्यशील मोहिते-पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवत आहे. पण, विधानपरिषद आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपमध्येच आहेत. त्यातच मोहिते-पाटलांच्या अकलूज या बालेकिल्ल्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. सभेपूर्वी रणजितसिंह मोहिते-पाटील पुष्पगुच्छ घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी आले होते. मात्र, फडणवीस यांनी रणजितसिंह मोहिते-पाटलांच्या पुष्पगुच्छाचा स्वीकार केला नाही.






धैर्यशील मोहिते-पाटील माढ्यातून लढण्यास इच्छुक होते. परंतु, भाजपनं विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना पुन्हा तिकीट दिलं. भाजपकडून डावलण्यात आल्यानंतर जयसिंह मोहिते-पाटील यांनी माढ्यातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. त्यानुसार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून माढ्यातून लोकसभेचा उमेदवारी अर्जही भरला आहे. मात्र, हा निर्णय घेत असताना मोहिते-पाटील कुटुंबीयांमध्येही मतभेद होते, हे तेव्हाही दिसून येत होते.
विजयसिंह मोहिते-पाटील हे धैर्यशील यांच्या प्रचारसभांमध्ये दिसत आहेत. पण, रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा ओढा अद्यापही भाजपकडेच आहे. भाजपमध्ये असले तरी रणजितसिंह मोहिते-पाटील निंबाळकर यांच्या प्रचारात सहभागी झाले नाहीत. तसेच, धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याही प्रचारात रणजितसिंह हे सक्रिय नाहीत.
यातच रणजितसिंह निंबाळकर यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या तीन सभा माढा लोकसभा मतदारसंघात झाल्या. अकलूजमधील सभेपूर्वी शंकरराव मोहिते-पाटील विद्यालयासमोर रणजितसिंह मोहिते-पाटील काही कार्यकर्त्यांसह देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी उभे होते. हे पाहून पोलिसांची पायलट गाडी थांबली. पण, फडणवीसांनी चालकाला पुढं जाण्यासाठी खुणावल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे रणजितसिंह मोहिते-पाटील यांचं पुप्षगुच्छ न स्वीकारताच फडणवीस सभेसाठी रवाना झाले. त्यामुळे फडणवीस रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जात आहे.
निंबाळकरांचा रणजितसिंह-मोहिते-पाटील यांच्यावर निशाणा
याच घटनेचा आधार घेत खासदार निंबाळकरांनी रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. “एवढी मदत करूनही गद्दारी केली. अकलूज चौकात फुलांचा गुच्छ घेऊन रणजितसिंह मोहिते-पाटील देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी उभे होते. पण, फडणवीस यांनी तो पुष्पगुच्छ स्वीकारला नाही. ते थेट सभेकडे आले. गद्दारांना माफी नाही. आता पक्ष त्यांची दखल घेणार नाही,” असं म्हणत निंबाळकरांनी रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यावर तोफ डागली.











