देशाचा विकास आणि नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष सध्या एकदिलाने वाटचाल करत असल्याचे प्रमुख नेत्यांकडून सांगितले जात आहे. मात्र, राज्यातील अनेक भागांमध्ये स्थानिक पातळीवर तिन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मनोमिलन तर सोडाच पण प्रचंड वितुष्ट असल्याच्या घटना अधूनमधून समोर येत असतात. याचाच प्रत्यय आता मुंबईत येताना दिसत आहे. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाग असलेल्या माहीम विधानसभा मतदरासंघात शिंदे गट आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांमधील वाद उफाळून आला आहे. भाजपच्या माहीम विधानसभा क्षेत्राच्या अध्यक्ष अक्षता तेंडुलकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांचे सुपुत्र आणि माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांच्यावर घणाघाती भाषेत टीका केली आहे.
समाधान सरवणकर हे मुंबई महानगरपालिकेतील शिंदे गटाचे माजी नगरसेवक आहेत. समाधान सरवणकर आणि त्यांची बहीण प्रिया सरवणकर यांचे स्थानिक पातळीवर अक्षता तेंडुलकर यांच्याशी वाद आहेत. याच वादाचा आता भडका उडाला आहे. अक्षता तेंडुलकर यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून अक्षता तेंडुलकर यांनी प्रिया सरवणकर आणि समाधान सरवणकर यांच्यावर जळजळीत भाषेत टीका केली आहे. हिंदुत्व आणि मोदींजींसाठी आम्ही काम करतो. बापाच्या दोन नंबरच्या पैश्यावर आणि पदावर आम्ही नाही उडत, आणि युतीधर्म फक्त भाजप पाळणार, अशा गैरसमजात अजिबात राहू नका. आमच्या नादी लागलात तर आरे ला कारे करायला आम्हाला चांगलंच जमतं, असे अक्षता तेंडुलकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माहीममध्ये भाजप विरुद्ध शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर आला आहे. यावर आता सदा सरवणकर काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. माहीमधील या वादाचा फटका आता दक्षिण मध्य मुंबईतील शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे यांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडून हा वाद लवकरात लवकर मिटवण्याचे प्रयत्न होतील.
समाधान सरवणकर यापूर्वीही वादाच्या भोवऱ्यात
समाधान सरवणकर यापूर्वी 2022 मध्ये गणेशोत्सवाच्या काळात ठाकरे गटाशी झालेल्या वादामुळे चर्चेत आले होते. त्यावेळी दादर परिसरात अनंतचतुर्दशीच्या दिवशी मिरवणुकांच्या स्वागतासाठी मंच उभारण्यात आला होता. या मंचाच्या शेजारी ठाकरे गटाकडूनही एक मंच उभारण्यात आला होता. त्यावेळी समाधान सरवणकर यांनी ‘म्याव म्याव’ असा आवाज काढत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना डिवचले होते. त्यामुळे दोन्ही गटात तुफान राडा झाला होता. काही दिवसांनी हा वाद पुन्हा उफाळून आला होता. हे प्रकरण पोलिसांत गेले. त्यावेळी सदा सरवणकर यांनी त्यांच्याकडील पिस्तुलातून पोलिसांदेखत गोळीबार केला होता. हे प्रकरण तेव्हा चांगलेच गाजले होते.