देशामध्ये लोकसभेची रणधुमाळी अतिउच्च पातळीला गेले असताना धार्मिक ध्रुवीकरणही तेवढ्याच पातळीमध्ये वाढत असून सध्या समाजातील वाढती तेढ ही मोठी समस्या बनत असताना देशात एक दिलासादायक घटना घडली ती म्हणजे एका ‘रहिम’चा जिव वाचवण्यासाठी राम आणि रहीम एकत्र श्रमले आणि 40 दिवसांमध्ये तब्बल 34 कोटी रुपये जमा केले आणि त्या मातेच्या डोळ्यातून आलेल्या आनंदाश्रू ही भारतीय संस्कृतीची पाळीमुळे अजूनही मजबूत असल्याचे जाणीव करून देत गेले.






खरे तर धार्मिक ध्रुवीकरणाच्या नावाने नुकताच देशात द केरला स्टोरी पिक्चर आला होता यामध्ये एका दाक्षिणात्य हिंदू समाजावर होणारे अतिक्रमण दाखवून दक्षिणेत भागातील हिंदू समाजावर होणारे अतोनात हाल यामधून स्पष्ट करण्यात आले होते. परंतु रील लाईफ पेक्षा रियल लाईफ मध्ये याच दक्षिण भारतातील आणि त्याच प्रांताने राम रहीम एकतेचा एक स्तुत कार्य केलं आहे. केरळवासीयांनी धार्मिक आणि राजकीय मतभेद बाजूला ठेवत सौदी अरेबियामध्ये मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या एका व्यक्तीला मुक्त करण्यासाठी आवश्यक असलेले 34 कोटी रुपये अवघ्या 40 दिवसांत उभे केले. या घटनेमुळे केरळमधील सामाजिक वातावरण किती समृद्ध आहे याची झलक पाहायला मिळाली आहे.
2006 पासून सौदी अरेबियातील तुरुंगात असलेल्या रहीमला हत्येचा आरोप सिद्ध झाल्यानंतर 2018 मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, गेल्या ऑक्टोबरमध्ये सौदी अरेबियाच्या न्यायालयाने पीडितेच्या कुटुंबीयांना ब्लड मनी म्हणून 34 कोटी रुपये दिल्यास रहीमची सुटका करण्याचे आदेश दिले होते. ब्लड मनी भरण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल होती. मुदत संपायच्या 3 दिवस आधी ही रक्कम भरण्यात आली.
सौदी अरेबियाला जाण्यापूर्वी रहीम कोझिकोड येथे ऑटो चालक म्हणून काम करायचा. रहीमला त्याच्या प्रायोजकाच्या 15 वर्षांच्या पॅराप्लेजिक मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल दोषी ठरविण्यात आले होते. मुलाची काळजी घेणे आणि त्याचा चालक म्हणून काम करणे, अशी रहीमची जबाबदारी होती. पण एकदा रहीमकडून चुकून त्या मुलाच्या गळ्यात जोडलेले वैद्यकीय यंत्र खाली पडले. यामुळे मुलगा बेशुद्ध पडला आणि मरण पावला.
रहीमने यापूर्वी सुटकेसाठी अनेक वेळा अपील केले होते. 2011, 2017 आणि 2022 मध्ये प्रत्येक वेळी त्याचे अपील फेटाळण्यात आले. मात्र, यावेळी न्यायालयाने त्याचे आपील स्वीकारल्याने त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. रहीमच्या सुटकेसाठी केलेल्या क्राउडफंडींगवर प्रतिक्रिया देताना केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले की, केरळ हा बंधुभावाचा बालेकिल्ला आहे, ज्याला कोणत्याही प्रकारचा जातीयवाद तोडू शकणार नाही.
“केरळ हा बंधुभावाचा बालेकिल्ला आहे ज्याला जातीयवादाने तोडता येणार नाही याचीच ही झलक आहे. रहीमच्या सुटकेसाठी सर्वांना एकत्र आणणाऱ्यांचे मी मनापासून कौतुक करतो, त्यांच्यामुळेच आज केरळची मान जगासमोर ताठ झाली आहे. याच एकजुटीसाठी आपण एक चित्ताने, दृढतेने पुढे जाऊया,” असे मुख्यमंत्री म्हणाले.
रहीमसाठी क्राउडफंडिंग करणाऱ्या संस्थेने सांगितले की, रियाधमधील 75 हून अधिक संस्था, केरळचे व्यापारी बॉबी चेम्मनूर, राज्यातील विविध राजकीय संघटना आणि सामान्य लोकांनी आम्हाला निधी उभारण्यात मदत केली. रहीमची आई फातिमा यांनी 34 कोटी रुपये जमा झाल्यावर सर्वांचे आभार मानले.










