सांगलीत काँग्रेसची डोकेदुखी आता जास्त वाढण्याची चिन्हं आहेत. कारण तशा घडामोडी आता काँग्रेसमध्ये घडत आहेत. महाविकास आघाडीत सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाला देण्यात आल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. सांगली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते आता चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत. महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन सांगलीची जागा ही ठाकरे गटासाठी सोडण्यात आल्याचं जाहीर केलं. तर ठाकरे गटाच्या कोल्हापूरच्या जागेवर काँग्रेसकडून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी दिली जात आहे. त्यामुळे या दोन जागांची आदलाबदल झाल्याची निश्चित करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं. असं असलं तरीही सांगलीतील काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत.






काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी नुकतंच सांगली जिल्ह्याच्या सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मविआत सांगलीची जागा ठाकरे गटासाठी सोडणं हा निर्णय आपल्याला पचनी पडलेलं नाही, असं म्हटलं. यानंतर आज सांगलीच मोठ्या हालचाली घडताना दिसत आहेत. सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस आधीपासून आग्रही होते. यासाठी आमदार विश्वजीत कदम दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे जावून आले. यानंतर पक्षाकडून विशाल पाटील यांना तयारी करण्याची सूचना देण्यात आली. पण यानंतर महाविकास आघाडीकडून अधिकृतपणे ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील हेच मविआचे अधिकृत उमेदवार असतील, असं जाहीर करण्यात आलं.
काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक
महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या या निर्णयाने सांगली जिल्ह्यातील काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा रोष निर्माण झालाय. कार्यकर्ते इतके आक्रमक झाले की त्यांनी सांगलीतील काँग्रेस भवनच्या इमारतीवरील काँग्रेस या शब्दाला कलर लावत काँग्रेस शब्द पुसला. सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी असं काँग्रेस भवनच्या इमारतीवर उल्लेख होता. कार्यकर्त्यांनी चिडून काँग्रेस शब्द पुसून टाकला.
विशाल पाटील अपक्ष लढण्याच्या तयारीत?
काँग्रेस पक्षाचे आक्रकर्ते प्रचंड आक्रमक होताना दिसत आहेत. कवठे महांकाळ, मिरत तालुक्याच्या कार्यकर्त्यांनी थेट राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. मिरज तालुक्याची काँग्रेसची कमिटी बरखास्त करण्यात आली आहे. काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांच्या कार्यालयाजवळ ही बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी कमिटी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. तसेच बैठकीतून बाहेर आल्यानंतर आक्रमक कार्यकर्त्यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बोर्डावरील काँग्रेस हा शब्द पुसून टाकला आहे. सांगली जिल्ह्यात काँग्रेसचं नाव घ्यायचं नाही, अशी भूमिका आता काँग्रेस कार्यकर्ते घेत आहेत. या घडामोडींनंतर आता विशाल पाटील अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत का? अशा चर्चांना उधाण आलंय. विशेष म्हणजे सांगली जिल्ह्याच्या काँग्रेस नेत्यांनी अजूनही ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना पाठिंबा जाहीर केलेली नाही.











