महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा सुटला असून, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून कोणता पक्ष कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे याचा अंतिम निर्णय झाला आहे. विशेष म्हणजे उद्याच याची घोषणा होणार आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे व नाना पटोले यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून महाविकास आघाडीचा जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर केला जाणार आहे. यासाठी उद्या सकाळी 11 वाजता तिन्ही पक्षाची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे.
मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा सुटला असून, उद्या तिन्ही पक्षाकडून उरलेल्या जागांची घोषणा केली जाणार आहे. जागावाटपाला घेऊन महाविकास आघाडीची उद्या 11 वाजता संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. मुंबईच्या मंत्रालय परिसरात ठाकरे गटाच्या पक्ष कार्यालयात ही संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेला शरद पवार, उद्धव ठाकरे व नाना पटोले संबोधित करणार आहे. यासोबतच संजय राऊत, जयंत पाटील व बाळासाहेब थोरात उपस्थित असणार आहे. यावेळी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर केला जाणार आहे. ज्यात सांगली, भिवंडी, मुंबईतील जागांसह इतर उर्वरित जागांवर कोणता घटक पक्ष निवडणुकीत आपला उमेदवार उतरवले यांची माहिती या संयुक्त पत्रकार परिषदेत दिली जाणार आहे.
सांगलीचा तिढा सुटणार?
महाविकास आघाडीत सांगली लोकसभा मतदारसंघावरून जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेसह काँग्रेसकडून एकाचवेळी सांगलीच्या जागेवर दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाने सांगलीमधून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याने हा वाद आणखीनच वाढला आहे. हा वाद एवढ्या टोकाला पोहचला आहे की, थेट मैत्रीपूर्ण लढत करण्याची मागणी केली जात आहे. अशात आता उद्या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर केला जाणार आहे. यावेळी सांगलीचा महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार याची देखील अधिकृतरीत्या तिन्ही पक्षाकडून घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमधील सांगलीचा तिढा सुटणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.