मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपत आली तरी सत्ताधारी महायुती आणि विरोधकांच्या महाविकास आघाडीतील उमेदवारांचा घोळ काही संपेना. महायुतीमध्ये आठ आणि महाविकास आघाडीमधील तीन जागांचा तिढा मंगळवारीही कायम होता.महाविकास आघाडीकडून उद्या (ता. ३) संयुक्त पत्रकार परिषद घेऊन अंतिम उमेदवार यादीची घोषणा करण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे पण त्याबाबतही साशंकता व्यक्त होते आहे.
महाविकास आघाडीमध्ये सांगली, दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघावरून काँग्रेस आणि शिवसेनेतील (ठाकरे गट) वाद अद्याप मिटलेला नाही. सांगली काँग्रेसला देण्याचा मार्ग काढला जाऊ शकतो, अशी शक्यता आज सायंकाळी निर्माण झाली होती. हातकणंगलेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्यासंदर्भात चर्चा रंगली होती, परंतु मंगळवारी तिथे शाहूवाडीच्या सत्यजित पाटील यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळू शकते अशी चर्चा आहे.
आधीच प्रकाश आंबेडकर दुरावले असताना राजू शेट्टी यांनाही बाजूला करून वजाबाकीचे राजकारण करणे महाविकास आघाडीला परवडणारे नाही, असा मतप्रवाह बळावल्यामुळे त्यासंदर्भात फेरविचार सुरू झाला आहे. भिवंडीच्या जागेबाबत काँग्रेसच्या आग्रहाची तीव्रता कमी झाल्याचे मानण्यात येते. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने पाच जागांवरील उमेदवार जाहीर केले असून माढा, भिवंडी, रावेर, बीड आणि सातारा येथील उमेदवारांची घोषणा बाकी आहे. भिवंडी, रावेर आणि बीडच्या उमेदवारांची घोषणा उद्या (ता.३) होऊ शकते. माढा आणि साताऱ्याचा निर्णय अद्याप झाला नसल्याचे सांगण्यात येते.
महाविकास आघाडीकडून अद्याप मुंबई उत्तर, कल्याण, जालना, पालघर, धुळे, मुंबई उत्तर मध्य या जागांवरील उमेदवारांची घोषणाही बाकी आहे. महायुतीमधील आधीच्या जागांचे वाद गुंतागुंतीचे बनले असताना मंगळवारी त्यात हिंगोली आणि हातकणंगलेच्या उमेदवार बदलाच्या चर्चेची भर पडली. यवतमाळ-वाशीम मतदारसंघातील अर्ज भरण्याची मुदत एकच दिवस उरली असताना तेथील उमेदवार ठरलेला नाही. नाशिकमधून हेमंत गोडसे यांनी शक्तिप्रदर्शन सुरू ठेवले आहे. मात्र ती जागा राष्ट्रवादीला देऊन तेथून छगन भुजबळ यांची तसेच रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवर भाजपकडून नारायण राणे यांची उमेदवारी निश्चित मानली जाते.
वंचितचा सुळेंना पाठिंबा, पुण्यातून वसंत मोरे
वंचित बहुजन आघाडीने आज पाच उमेदवारांची यादी जाहीर केली. पुण्यातून वसंत मोरे यांना उमेदवारी देऊ केली आहे. बारामतीमध्ये वंचित आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. महाविकास आघाडीसोबत न जाता ‘वंचित’ने कोल्हापूर, नागपूरपाठोपाठ आज बारामतीमध्येदेखील आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देणे पसंत केले. ‘वंचित’ने याआधी २० उमेदवार जाहीर केले होते. आता नांदेड येथून अविनाश भोसीकर, परभणीतून बाळासाहेब उगले, छत्रपती संभाजीनगर येथून अफसर खान, पुणे येथून वसंत मोरे आणि शिरूर येथून मंगलदास बांदल यांना उमेदवार करण्यात आले आहे.
या जागांवरून तिढा
महायुती (आठ जागा)
हिंगोली हातकणंगले, नाशिक, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, सातारा, पालघर, ठाणे, कल्याण
महाविकास आघाडी (तीन जागा)
सांगली, भिवंडी, दक्षिण मध्य मुंबई
मुख्यमंत्री शिंदे यांची कोंडी
साताऱ्याबाबतही निर्णय न झाल्यामुळे उदयनराजे भोसले यांच्या गोटात अस्वस्थता आहे मात्र तोही निर्णय लवकरच अपेक्षित आहे. पालघर, ठाणे, कल्याण या तीन मतदारसंघांतील तिढा सुटत आला असला तरी त्यावर शिक्कामोर्तब करायचे तर मुख्यमंत्र्यांना आपली एक जागा गमावावी लागणार आहे. उस्मानाबादची जागा राष्ट्रवादी (अजित पवार) गटाला मिळाली असून तेथे राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जाते.