उदयनराजेंच्या विरोधात मविआची नवी मोठी खेळी; सर्व विरोधक एकत्र? हे अभ्यासू नेते निवडणुक रणांगणात

0

सातारा लोकसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते श्रीनिवास पाटील हे खासदार आहेत. पण त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव पुन्हा लढण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या जागेवर आता कुणाला उमेदवारी द्यायची? याबाबत महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरु आहे. भाजपकडून खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात तितकाच ताकदवान उमेदवार उभा करण्याची महाविकास आघाडीची रणनीती आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून आज कराडमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात आज सविस्तर चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास एक तासापेक्षा जास्त वेळ बंद दाराआड चर्चा झालीय.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

साताऱ्यातून लढण्यास श्रीनिवास पाटील यांनी नकार दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतून राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी दिली जावू शकते, अशी चर्चा आहे. यापैकी पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव आता जवळपास निश्चित असल्याचं मानलं जात आहे. कारण पृथ्वीराज चव्हाण यांचं पारडं जड आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्री पदाचा अनुभव आहे. तसेच त्यांना दिल्लीचासुद्धा अनुभव असल्याने त्यांचं पारडं जड असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

पृथ्वीराज चव्हाण कोणत्या चिन्हावर लढणार?

पृथ्वीराज चव्हाण हे स्वच्छ चेहरा आहेत. तसेच त्यांचे स्थानिक पातळीवर सर्वांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना साताऱ्यातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. असं असलं तरी पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव ठरल्यास ते तुतारी की पंजा चिन्हावर निवडणूक लढणार? हे अस्पष्ट आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी आणि साताऱ्याच्या जागेत काँग्रेस आणि शरद पवार गटात आदलाबदल होऊ शकते.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

सातारा लोकसभेचा नेमका इतिहास काय?

सातारा लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर या मतदारसंघात आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद राहिली आहे. या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच उमेदवार खासदार म्हणून निवडून आले आहेत. विशेष म्हणजे 1996 मध्ये शिवसेनेकडून हिंदुराव नाईक निंबाळकर हे निवडून आले होते. त्याआधी प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस उमेदवार विजयी झाले आहेत. तसेच 1998 ला पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार जिंकून आले होते. त्यानंतर आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जिंकून आले आहेत.

दरम्यान, यावर्षी साताऱ्यात लोकसभा निवडणुकीत परिस्थिती वेगळी आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर सगल 3 वर्षे जिंकून येणारे उदयनराजे हे भाजपात आहेत. ते भाजपकडून निवडणुकीच्या रणांगणात आहेत. तर राष्ट्रवादीचे सध्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभा लढण्यास नकार दिलाय. त्यामुळे महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता महायुती आणि महाविकासा आघाडी दोघांसाठी ही लढत प्रतिष्ठेची आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार