सातारा लोकसभा पुन्हा टिवस्ट; निवडणूक लढण्यास नकार; 5 पैकी कुणाला उमेदवारी? नवी चर्चा सुरु

0

साताऱ्यातून मोठी बातमी आहे. शरद पवार गटाचे साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. आरोग्याचं कारण देत श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. खुद्द माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनीच ही माहिती दिली आहे. येत्या दोन ते तीन दिवसात साताऱ्यातील उमेदवाराची घोषणा केली जाईल, असंही शरद पवार यांनी सांगितलं. त्यामुळे पवार कुणाला उमेदवारी देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे आज सातारा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. हा संवाद साधत असताना शरद पवार यांनी ही माहिती दिली. लोकसभा निवडणुकीसाठी तीन पक्षांची आघाडी झाली आहे. या आघाडीने साताऱ्याच्या जागेवर सखोल चर्चा केली. साताऱ्याशी यशवंतराव चव्हाण यांचा संबंध राहिला आहे. राष्ट्रवादीसाठी हा महत्त्वाचा जिल्हा आहे. इथला कोणताही निर्णय काळजीपूर्वक घेतला पाहिजे, असं शरद पवार म्हणाले.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

शेवटी इच्छा नसतानाही…

श्रीनिवास पाटील यांची कामगिरी चांगली होती. त्यांची संसदेत चांगलं काम केलं. त्यांनी विकासाची कामे प्रामाणिकपणे कामे केली. त्यांनी पुन्हा निवडणुकीत उभं राहावं असं सर्वांचं म्हणणं होतं. पण आरोग्याचे काही प्रश्न असल्याने त्यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. श्रीनिवास पाटील यांच्याशी चार ते पाच वेळा चर्चा झाली. आरोग्यामुळे न्याय देऊ शकणार नाही. त्यामुळे लढण्यात अर्थ नाही. पण पक्ष सांगेल ते काम मी करेल. मला निवडणुकीच्या प्रक्रियेतून मुक्त करा, असं श्रीनिवास पाटील यांनी सांगितलं.

आम्ही सर्वांनी त्यांना निवडणूक लढण्याचा आग्रह केला. पण त्यांनी शेवटी नाही म्हटलं. इच्छा नसताना आम्ही त्यांची भूमिका मान्य केली. दोन-तीन दिवसात या जागेवरील उमेदवार ठरवू. ज्यांची निवड केली जाईल त्यांना निवडून आणण्याचं काम आपलं आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

साताऱ्यात नवा गडी?

साताऱ्यातून श्रीनिवास पाटील यांच्या जागी कोण? याबाबतची मते जाणून घेण्यासाठी पवार साताऱ्यात आले आहेत. यावेळी ते कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. तर, सातारा लोकसभा मतदारसंघासाठी आमदार बाळासाहेब पाटील, सुनील माने, आमदार शशिकांत शिंदे, सारंग पाटील आणि सत्यजित पाटणकर यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. यापैकी कुणाच्या नावावर शरद पवार शिक्कामोर्तब करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच साताऱ्यात नवीन उमेदवार मिळण्याचीही दाट शक्यता वर्तवली जात आहे.