“दुसऱ्यांच्या झेंड्यावर पंढरपूर करणारी आपली औलाद नाही. अमित शाह साहेबांकडे गेले. आम्हाला वाचवा, आम्हाला उमेदवारी द्याच. कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी गेलो म्हणून सांगितले आणि उमेदवारी मागायला गेले. त्यांना कोणीतरी सांगितले असेल की दोन दिवसांत कांदा निर्यातबंदी उठणार आहे. त्यानंतर सगळीकडे पत्रकार परिषदा घेऊन सांगत सुटले. आम्ही जे केलं तेच बोलतो”,असं शरद पवार गटाचे आमदार निलेश लंके म्हणाले. ते अहमदनगर येथील सभेत बोलत होते.






दलीत सुधार योजनेचे श्रेय सुद्धा यांनी घेतलं
निलेश लंके म्हणाले, रात्री-अपरात्री गाडी अडवली आणि कार्यकर्त्यांना अडचण आली तर समस्या सोडवणे हे देखील लोकप्रतिनिधीचे काम आहे. आमच्या कार्यकर्यांना जाहीरपणे सांगितलं. एक फोन दाखवा एक फोन रेकॉर्ड दाखवा आणि हजार रुपये मिळवा. एक पैज माझ्याबाबत लावायला पाहिजे होती, फायदा झाला असता. दलीत सुधार योजना ग्रामपंचायतीचा अधिकार असतो. यामध्ये तुमचा काय संबंध आहे. त्याचे सुद्धा श्रेय यांना कमी पडले.
मी माझा लेखाजोखा घेऊन बसलोय
निलेश लंके पुढे बोलताना म्हणाले, लोकांची किती वेळा दिशाभूल करता. लाज वाटूद्यात. लोकसभा निवडणुकीत लोकांना मोठमोठे आश्वासन दिले. आम्ही हे काम करु ते काम करु. काहीच केलं नाही. श्रीगोंदा भागात सांगितले की, पाणी आणल्याशिवाय मत मागायला येणार नाही. मी हजार वेळेस सांगितलं की, मी माझा लेखाजोखा घेऊन बसलोय. तुम्ही तुमचा लेखाजोखा घेऊन या. कोणत्या मंत्र्याला कोणत्या कामासाठी भेटले याचा लेखाजोखा द्या. शेतकऱ्याचा मुलगा म्हणून लोकसभेत कामकाजासाठी जाता. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी केलेलं, पाच वर्षातील एक भाषण दाखवा. निलेश लंकेचे विधानसभेतील भाषण बघा. बेरोजगारांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. एमआयडीसी झाली पाहिजे, पाण्याचे प्रश्न सुटले पाहिजेत. यासाठी आम्ही प्रयत्न केले, असंही लंके यांनी नमूद केलं.










