औषधाप्रमाणे नात्यांचीही एक्सपायरी डेट झाली समजायचं वयस्करांची अवहेलना हा नालायकपणाच: श्रीनिवास पवार

0

घरातील वयस्कर लोकांनी जमीन आपल्या नावावर केली म्हणजे त्यांनाच घराबाहेर काढायचं नसतं. आतापर्यंत साहेबांमुळं ज्यांना पहिल्या दिवसापासून पदं मिळाली आहेत. त्याच साहेबांना आता घरी बसा, असं म्हणणं मला पटलं नाही. पुढची 10वर्षे आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे, म्हणून आपण वयस्कर माणसांची किंमत करत नाही, यासारखा नालायकपणा नाही, अशा शब्दांत श्रीनिवास पवार यांनी आपले सख्खे बंधू उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला.

बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे श्रीनिवास पवार यांनी एक मंदिरात ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, तुम्हाला आश्चर्य वाटेल की, मी अजितदादांच्या विरोधात कसा काय गेलो. चांगल्या आणि वाईट काळात मी कायम अजितदादांच्या सोबत राहिलो आहे. त्यांनी जे काही निर्णय घेतले, त्याला मी कायम साथ दिली आहे. भाऊ म्हणून ते म्हणतील तशी मी उडी मारली. मी कधीही असं का करतो म्हणून विचारलं नाही.

अधिक वाचा  काँग्रेसमधील बड्या नेत्याचा अजितदादांना फोन; या महापालिकेत एकत्र लढायचं का? कार्यकर्त्यांनी 238 मतदारसंघात… दादांचं हे मत

माझी आणि अजितदादांची जेव्हा चर्चा झाली, तेव्हा मी अजितदादांना सांगितलं की, आमदारकी तुमच्याकडे आहे, तर खासदारकी साहेबांकडे ठेवू. कारण साहेबांचे आमच्यावर अनेक उपकार आहेत. साहेबांना या वयात सोडणं, हे मला पटलं नाही. इथून पुढं दादांची वर्षे असतील, साहेबांची नसतील. हा विचार मला प्रचंड वेदना देऊन गेला. आपण वयस्कर माणसांची किंमत करत नाही. पुढची दहा वर्षे आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे, यांसारखा नालायकपणा नाही, असं माझं म्हणणं आहे, असेही श्रीनिवास पवार यांनी नमूद केले.
पवार म्हणाले, मी राजकारणी नाही, त्यामुळे मला जे पटत नाही, ते मी करत नाही. औषधाच्या पाकिटावर जशी एक्सपायरी डेट असते, तशी काही नात्यांचीही एक्सपायरी डेट असते. तशी एक्सपायरी झाली असं समजायचं आणि पुढे चालत राहायचं. वाईट वाटून घ्यायचं नाही. मला दबून वागायचं आणि जगायचं नाही. जगायचं तर स्वाभिमानानं जगायचं. चांगलं काम करा आणि मनाला पटतं ते करा. त्यांनाही झोप येत असेल असं मलाही वाटत नाही. पण ठीक आहे, प्रत्येकाला विचार असतात.

अधिक वाचा  पक्ष प्रवेशातच वादळ काँग्रेस, उबाठा माजी नगरसेवकांचा प्रवेश; मंत्री महोदयांसमोर कार्यकर्ते भिडले बंदोबस्त तैनात

शरद पवार यांनी काय केले, यांसारखा आश्चर्यकारक प्रश्न नाही. ज्या साहेबांनी आपल्याला चारदा उपमुख्यमंत्री केलं, पंचवीस वर्षे मंत्री केलं, तरीही काकांनी माझ्यासाठी काय केलं, असं म्हणायचं. असे काका मला मिळाले असते, तर मी खूष झालो असतो. असा त्रास देणारी व्यक्ती कोणाला नको आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

ही चाल भाजप आणि संघाची आहे, हे त्यांना समजलं नाही का. त्यांना शरद पवार हे नाव संपवायचं आहे. त्यांनी खूप प्रयत्न केला. पण, जेव्हा घरातील एखादी व्यक्ती फोडता येते, तेव्हाच ते घर संपतं. पण घर एक असेल तर ते संपूच शकत नाही. घरातीलच माणूस घरच्यांना घाबरत नाही. पण गावात भीती असते. मलाही माहिती आहे की आजूबाजूला तेच चालतं. मी कोणालाही घाबरत नाही. मी इथून पुढे बोलणार आहे, हे मला पटलेलं नाही. साहेबांना एकलुती एक मुलगी आहे. या वयात सोडून गेल्यावर साहेबांना काय वाटत असेल. वय वाढलं म्हणून तुम्ही वयस्कर माणसाला कमजोर समजू नका, असे आवाहन श्रीनिवास पवार यांनी आपल्या भावाला केले आहे.

अधिक वाचा  निवृत्तीच्या उंबरठ्यावर नसलेल्या शिक्षकांना ‘टीईटी’ बंधनकारक; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य सरकारची काय भूमिका?