बौद्धजन सहकारी संघाच्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न

0

मुंबई: सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत सहकार क्षेत्रात सध्या पदार्पण करणाऱ्या बौद्धजन सहकारी संघाकडे कार्यकर्तृत्वामुळे नेहमीच आदराने पाहिले जाते, या संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच राजेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परेल, मुंबई – १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

सदर प्रसंगी सर्वप्रथम महामानवांच्या प्रतिमांस पुष्प अर्पण करून ज्योत प्रज्वलित करण्यात आली तद्नंतर संस्कार समिती अध्यक्ष संदीप गमरे, कैलास मोहिते, सुगंध कदम आणि ग्रुप यांनी धार्मिक विधी सुमधुर वाणीने पार पाडला त्यानंतर प्रास्ताविक आणि मागील वृत्त माजी चिटणीस संजय तांबे यांनी सादर केले; सभेत त्या अहवालावर चर्चा करून अहवाल संपन्न करण्यात आला त्याचबरोबर बौद्धजन सहकारी संघाच्या वतीने विवाह मंडळ, न्यायदान कमिटी, शिक्षण कमिटी आणि संस्कार कमिटी अश्या चार उपसमित्यांची लोकशाही पध्दतीने निवडणूक घेऊन विजयी उमेदवारांची नावे घोषित करून त्यांना विश्वस्त, कार्याध्यक्ष, अध्यक्षांच्या हस्ते नियुक्तीपत्र, पुष्पसुमन देऊन सन्मानित करण्यात आले, तसेच महाराष्ट्र शासनाने ज्यांची सहकारी विभागावर लेखा निरीक्षक म्हणून नियुक्ती केली असे शैलेंद्र पवार यांची अंतर्गत तपासनीस म्हणून सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

सदर प्रसंगी संघाची यशस्वी वाटचाल पुढे नेण्यासंदर्भात अनेक वक्त्यांनी, सभासदांनी, विचारवंतांनी आपले मार्गदर्शनपर विचार मांडले त्या सर्वच विचारांचे खेळीमेळीच्या वातावरणात स्वागत करण्यात आले, सदर प्रसंगी महिला प्रतिनिधी ज्योती जाधव यांनी महिला प्रतिनिधींची निवड न करण्यात आल्या बद्दल खंत व्यक्त केली त्यावर खुलासा करताना अध्यक्ष, कार्याध्यक्ष यांनी सांगितले की शाखा व विभागाच्या वतीने महिला प्रतिनिधी न पाठविल्याने महिला प्रतिनिधींची निवड करण्याबाबत व्यवस्थापन मंडळ, मध्यवर्ती कमिटी व आम्ही ही अडचणीत आलो परंतु आपल्या सुचनेस मान देऊन आपल्या सुचनेवर फेरविचार करून पुन्हा नवीन परिपत्रक काढून महिला प्रतिनिधींची निवड करण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. सदर सभा यशस्वी होण्यासाठी कार्याध्यक्ष दीपक मोहिते, अध्यक्ष राजेंद्र जाधव, सचिव संदेश गमरे, विभाग अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले त्याबद्दल सभागृहाच्या वतीने त्यांचे आभार मानले व सर्वसाधारण वार्षिक सभेची सांगता करण्यात आली.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती