सांगलीत काँग्रेसचा ‘बाहुबली’ होतोय, पण ‘कटप्पा’च्या भूमिकेत कोण? हे पोस्टर व्हायरल राजकीय वर्तुळात चर्चा

0
3

सांगली लोकसभा मतदार संघात पैलवान चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची जाहीर सभेत आणि आता थेट यादीत घोषणा करून शिवसेना ठाकरे गटाने काँग्रेसला दोनवेळा ‘ओव्हरटेक’ केले आहे. काँग्रेस अद्याप अंधारात चाचपडत आहे. या घडीला काँग्रेसची अवस्था ‘बाहुबली’सारखी होताना दिसते आहे आणि या खेळात ‘कटप्पा’ कोण आहे, याची चर्चादेखील जोर धरू लागली आहे.

बाहुबली सिनेमात माहिष्मती साम्राज्याची साम्राज्ञी शिवगामीदेवी कुणालाही न विचारता ‘देवसेना’चा हात ‘भल्लालदेव’च्या हाती देण्याचा निर्णय घेते. ‘देवसेना’ तर बाहुबलीच्या प्रेमात असते. बाहुबली बंड करतो. त्यातून संघर्ष होतो. टोकाला जातो. कट शिजवले जातात आणि स्वकीय असणारा कटप्पाच बाहुबलीच्या पाठीत तलवार खुपसतो… प्रश्‍न उरतो, ‘कटप्पाने बाहुबली को क्यों मारा?’

अधिक वाचा  पुणे महापालिका प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस; शेवटचा दिवस; उत्तर आणि दक्षिण टोकावरील या प्रभागावर सर्वाधिक हरकती

आज महाविकास आघाडीतील जागावाटपात सांगलीचा तिढा एवढा वाढलाय की, काँग्रेस समर्थकांना प्रश्‍न पडलाय, ‘शिवसेनेचा सांगलीसाठी एवढा हट्ट का?’ आणि ‘या हट्टात कटप्पा कोण?’ बाहुबली सिनेमाच्या दुसऱ्या भागात काही प्रश्‍नांची उत्तरे मिळाली होती. कदाचित, या रणातही मिळतील, उद्योगमंत्री उदय सामंत तसा ‘शब्द’ देऊन गेले आहेत. ठाकरेंनी चंद्रहार पाटलांची उमेदवारी का जाहीर केली, यामागचा डाव ते सांगणार आहेत. या वेगवान घडामोडींत शिवसेनेने काँग्रेसला तब्बल तीनवेळा ‘ओव्हरटेक’ केले आहे.

काँग्रेसची गाडी मात्र पुढचा गिअर टाकण्यात अडकून पडली आहे. कोल्हापूर मतदार संघ काँग्रेसला देण्याचा विषय आला, त्या वेळी ‘सांगली रिकामी आहे’, असा प्रस्ताव महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चेला कुणी आणला, यावरून बराच खल सुरू आहे. ‘कोल्हापूर’च्या बदल्यात ‘सांगली’ असे ठरलेच नव्हते,’ असे आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केले आहे. खासदार संजय राऊत सांगतात, ‘सांगली’चे ठरले, तेव्हा काँग्रेसचे पाच प्रमुख नेते उपस्थित होते.’ तेवढ्यावर राऊत थांबले नाहीत, मिरजेत तातडीने सभा लावली आणि उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार यांचे नाव जाहीर करून टाकले.

अधिक वाचा  पुण्यात १४ वर्षात नदीची वहन क्षमता घटल्याने पुराचा धोका ४०% नी वाढला

त्या वेळी काँग्रेस राज्यातील नेत्यांपुढे शक्तिप्रदर्शन करायला चाचपडत होती. तेवढ्यावर थांबेल ती शिवसेना कसली? आज काँग्रेसचे नेते दिल्लीच्या विमानात होते, तोवर शिवसेनेच्या यादीत ‘सांगली’च्या नावाचा समावेश करण्यात आला. पुन्हा एकदा शिवसेनेने काँग्रेसला मात दिली. हा ताण वाढत निघाला आहे. काँग्रेस प्रसंगी मैत्रीपूर्ण लढतीच्या तयारीत आहे. सगळेच गणित फिस्कटले तर विशाल पाटील यांचे बंड होऊ शकते, त्यासाठी आमदार विश्‍वजित कदम तयार होतील का, हा प्रश्‍न बाकी आहे.

काँग्रेस कार्यकर्त्यांना मात्र एक प्रश्‍न सतावतो आहे, ज्या शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ चिन्ह एकनाथ शिंदे यांनी पळवले, ती शिवसेना पश्‍चिम महाराष्ट्रात ‘चिन्ह’ नाही, म्हणून एवढी का टोकाला गेली आहे? महाविकास आघाडीत कोण किती जागा लढतो यापेक्षा किती जिंकतो, याला महत्त्व का दिले जात नाही, असा प्रश्‍न आता काँग्रेसचे कार्यकर्ते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना विचारू लागले आहेत. या प्रश्‍नाचे उत्तर शिवसैनिकांनी टाळले आहे, त्यांना कदाचित माहिती आहे, या खेळात ‘कटप्पा’ कोण आहे?

अधिक वाचा  रोहित शर्माने 2० किलो वजन कमी कसं केलं, संपूर्ण दिवसाचा दिनक्रम अन् आहार