दिल्लीतील कथित दारू धोरण घोटाळा प्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा आम आदमी पक्षाने केला आहे. दिल्लीतील कथित दारू धोरण घोटाळा प्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा आम आदमी पक्षाने केला आहे. यासंदर्भात दिल्ली हायकोर्टात याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज बुधवारी सकाळी १०.३० वाजता सुनावणी होणार आहे.






त्यामुळे केजरीवाल यांना जामीन मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. गेल्या गुरुवारी (ता. २१) ईडीने अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या दिल्लीतील निवास्थावरून अटक केली होती. यानंतर त्यांना शुक्रवारी राऊस ॲव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. केजरीवाल यांची चौकशी करण्यासाठी ईडीने १० दिवसांची न्यायालयीन कोठडी मागितली होती.
मात्र, न्यायालयाने ईडीची ही मागणी अमान्य करत केजरीवाल यांना २८ मार्चपर्यंत ६ दिवसांचीच न्यायालयीन कोठडी दिली. दरम्यान, ईडीने केलेल्या अटकेला आणि ट्रायल कोर्टाने दिलेल्या रिमांड आदेशाला केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यांच्या वकिलाने सरन्यायाधीशांकडे तातडीने सुनावणीची मागणी केली होती.
मात्र, उच्च न्यायालयाने यावर तातडीची सुनावणी घेण्यास नकार देत या प्रकरणाची सुनावणी बुधवारी (२७ मार्च) होईल, असे स्पष्ट केले. त्यानुसार आज केजरीवाल यांच्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टात सुनावणी होणार आहे. अरविंद केजरीवाल यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी बाजू मांडणार आहेत. त्यामुळे केजरीवाल यांना दिलासा मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
ईडीने कोर्टात काय दावा केलाय?
दिल्ली अबकारी धोरण घोटाळा प्रकरणात आम आदमी पक्षाने मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप ईडीने केला आहे. या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल असल्याचा दावा ईडीने केला आहे. याप्रकरणात ईडीने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना आधीच अटक केली आहे.












