कोथरूड मधील वनाझ शिवशंभो सेवा प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाशिवरात्रि उत्सवामध्ये वनाझ परिवार शिव मंदिरामध्ये भाविकांचा उत्साह मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत होता. महाशिवरात्री उत्सवाला पहाटे सहा वाजल्यापासून गाभाऱ्यामध्ये जाऊन दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले होते. सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या.






मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आणि सभामंडपामध्ये केलेली फळांची आरास आणि मंदिराला आणि मंदिर परिसरामध्ये केलेली आकर्षक विद्युत रोषणाई भाविकांना आकर्षित करत होती.भल्या पहाटे मंदिरामध्ये शंभू महादेव श्री शिवशंकर रुद्र दुग्धाभिषेक करून रुद्र महायाग सुरू करण्यात आला. सकाळी ठीक नऊ वाजता टाळ मृदंगाच्या गजरामध्ये पालखी सोहळ्याला सुरुवात झाली.वनाझ परिवारातील असंख्य महिला भगिनी पारंपरिक वेशभूषेत या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. कोथरूड मधील आझाद नगर मार्ग गुजरात कॉलनीतून पौड रस्त्याने पुन्हा वनाझ शिवमंदिर येथे पालखी प्रदक्षिणा करण्यात आली.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी देखील मंदिरामध्ये दर्शनासाठी हजेरी लावली. तर नवनिर्वाचित राज्यसभा खासदार मेधाताई कुलकर्णी यादेखील उपस्थित होत्या .कोथरूड मधील विविध राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांनी,आजी माजी नगरसेवकांनी मंदिरामध्ये हजेरी लावून दर्शनाचा लाभ घेतला.
दुपारची महाआरती माजी महापौर मुरलीधर मोहोळ व सौ.मोनिका मोहोळ यांच्या शुभहस्ते करण्यात आली. त्यावेळी स्वामीभक्त गुरुवर्य दादा ठोंबरे देखील उपस्थित होते. सायंकाळची महाआरती शिवसेना माजी गटनेते पृथ्वीराज सुतार यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. रात्री अकरा वाजता उसाच्या रसाचा अभिषेक व भस्म आरती संपन्न झाली. रात्री उशिरापर्यंत भाविक बहुसंख्येने दर्शनासाठी उपस्थित होते.
महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवार ९ मार्च २०२४ रोजी ह.भ.प.श्री विनायक महाराज निघोट यांची काल्याचे किर्तन संपन्न झाले. वनाझ परिवारातील असंख्य महिला भगिनींच्या प्रयत्नातून शिवभक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलं होतं.सकाळी अकरा वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत शिवभक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.
कोथरूड मधील सुमारे साडेचार हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी महिलांसह जेष्ठ नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती.
८ मार्च रोजी जागतिक महिला दिन असल्यामुळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोथरूड उपविभाग अध्यक्ष संजय काळे यांच्या संकल्पनेतून “कोथरूड स्त्री सन्मान पुरस्कार २०२४” चे वितरण करण्यात आले. यामध्ये नवनिर्वाचित खासदार मेधाताई कुलकर्णी, सौ.स्नेहल तरडे, डॉ.मनिषा सोनवणे, श्रीमती कमल सातपुते, सौ.रश्मिता शहापूरकर, सौ.सोनाली भालेसईन, सौ.अश्विनी काळे, कु.आदिती डोंगरे आणि की.कादंबरी किरण मोहोळ या नवदुर्गांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वनाझ परिवारातील बाल गोपाळांपासून महिला भगिनींसह ज्येष्ठ नागरिकांचा एकोपा यावेळी दिसून आला.
प्रतिष्ठानचे उत्सव प्रमुख युवराज गायकवाड,कार्याध्यक्ष दीपक कुल, सचिव विकास जाधव, यांच्यासह जनार्दन सातपुते, शाम सुर्वे, बाबासाहेब गायकवाड, यतिन घरत, महेश यादव, मिलिंद देशपांडे, विकास मंदिर, संतोष बाईत, केदार घाटे, विनायक पवार, मनोज परब, दीपक राऊत, विशाल उभे यांच्या विशेष प्रयत्नातून हा महाशिवरात्री उत्सव यशस्वीरित्या पार पडला.












