लोकसभा निवडणुका तोंडावर आली तरी राज्यातील महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटताना दिसत नाही. परिणामी भाजपने देशभरातील 195 उमेदवारांची यादी जाहीर केलेल्या यादीत राज्यातील एकाचेही नाव आले नाही. हा तिढा सोडवण्यासाठी खुद्द केंद्रीय मंत्री अमित शाहांना मंगळवारी राज्यात यावे लागले. अमित शाह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याची रात्री उशिरापर्यंत चर्चा करणार आहे. त्यामुळे शाहांची स्ट्रॅटेजी मॅजिक घडवून रात्रीत तिढा सोडवणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.






महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघातील तब्बल 18 जागांवर शिवसेनेने आणि 10 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे. भाजपच्या या दोन मित्रपक्षांनी केलेले दावे अवाजवी आहेत. त्यामुळे सुमारे युतीत 15 जागांबाबत तिढा निर्माण झाल्याची माहिती आहे. त्यामुळे या मित्रांना नाराज न करता जागावाटपाचे गणित साधणे शाहांपुढे आव्हान आहे. लोकसभेत भाजपने अधिक जागा जिंकणे फायद्याचे असल्याचे शाह राज्यातील नेत्यांना रात्री उशिरापर्यंत समजावून सांगत होते.
बारामती लोकसभा मतदारसंघावर अजित पवार यांच्याशी चर्चा झाली. त्या वेळी राष्ट्रवादीला हव्या असलेल्या अन्य जागांवरही प्रारंभिक चर्चा झाल्याची माहिती आहे. तसेच माझ्यावर विश्वास ठेवून महायुतीत प्रवेश केलेल्या शिवसेनेच्या खासदारांना पुन्हा तिकिट देण्याचा शब्द दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शाह यांनी शिंदेंचे म्हणणे बंद दाराआड ऐकून घेतले. मात्र परिस्थिती योग्य प्रकारे समजावून सांगण्यावर भाजप भर देणार असल्याचे समजते.
रत्नागिरी, मुंबईतील तीन, विदर्भातील तीन तसेच मराठवाड्यातील चार जागांवर तिढा आहे. मंगळवारच्या रात्री झालेल्या चर्चेनंतर बुधवारी पुन्हा सकाळी शाह तिन्ही नेत्यांशी सविस्तर चर्चा करण्याची शक्यता आहे. मित्र गटांच्या मागण्या मान्य करणे शक्य नसले तरी त्यामागचे कारण त्यांना समजावून सांगण्यावर भर दिला जाणार आहे. या चर्चेनंतर महायुतीतील जागावाटपाचा काय फॉर्म्युला असेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.










