उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांनी मुंबईत भाजपच्या कार्यालयात भाजप पक्षात प्रवेश करतो आहे. आयुष्याची नवीन सुरुवात करतोय. 38 वर्षांच्या राजकीय प्रवासात बदल करतोय, असे भाजप प्रवेशानंतर अशोक चव्हाण म्हणाले.
भाजपमध्ये आणखी कोण प्रवेश करणार? यावर अशोक चव्हाण यांनी सूचक वक्तव्य केले आहे. हा माझा व्यक्तिगत निर्णय होता. मी कोणालाही आमंत्रित केलेले नाही. जे काही ते देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे यावर काम करत आहेत. देवेंद्र फडणवीसही त्यांच्यासोबत आहेत. त्यांना गरज पडल्यास नक्की मी मदत करेन, असे म्हणत अशोक चव्हाण यांनी सूचक विधान केले आहे. यामुळे काँग्रेसमधून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नेत्यांचे इनकमिंग होण्याची दाट शक्यता आहे.
काँग्रेस नेत्यांच्या भाजप प्रवेशाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उत्तर दिले. अशोक चव्हाणांची कुठे आणि कशी मदत घ्यायची हे आम्हाला पक्के ठाऊक आहे, असे सांगत फडणवीस यांनीही सूचक विधान केले आहे. तसेच राज्यसभेच्या उमेदवारीबाबतचा निर्णय केंद्रीय पातळीवर घेतला जातो, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
भाजपमध्ये प्रवेशाचा निर्णय माझ्यासाठी खूप अवघड होता. यावर अतिशय गहन चर्चा केल्यानंतर निर्णय घेतला. पण देशाच्या, राज्याच्या आणि जिल्ह्याच्या हितासाठी मी हा निर्णय घेतला. हा निर्णय घेण्यात खूप वेळ लागला. एका दिवसात हा निर्णय झालेला नाही, असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.