जनतेशी जोडले गेलेल्या नेत्यांची घुसमट? श्वेतपत्रिकेत आधी दादा अन् आत्ता चव्हाणांनीही काँग्रेस सोडली!

0
2

“भाजपमध्ये येता का जेलमध्ये जाता”, असा अघोषित फतवा सध्या भारताच्या राजकारणात निघाला आहे. काँग्रेस असो का राष्ट्रवादी काँग्रेस असो, शिवसेना असो का जनता दल असो…, या सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींना हा एक इशारा आहे. गेल्या दहा वर्षांत काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत ज्या वेगाने विरोधी पक्षांचे नेते भाजपमध्ये सामील झाले आहेत. तो या इशाऱ्याचा परिपाक असून, आजही तेच झाले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा देऊन भाजपच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे आणि याचं मुख्य कारण आहे ते भाजपने लोकसभा अधिवेशनादरम्यान काढलेली श्वेतपत्रिका ठरली.

यात चव्हाण यांच्या आदर्श प्रकरण तसेच इतर अनियमित कारभाराचा पर्दाफाश करण्यात आला होता. हा एक त्यांना इशारा होता. हा इशारा मिळताच तपास यंत्रणांची कारवाई आणि नंतर तुरुंगवास सहन करण्यापेक्षा भाजपमध्ये गेलेले बरं, असा त्यांनी सोपा मार्ग निवडला.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?

अशोक चव्हाण यांच्याबाबत जसं झालं होतं तसंच सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबतसुद्धा घडलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदल्या दिवशी अजितदादांच्या 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला आणि नंतर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस फोडून भाजपच्या महायुतीत सामील झाले. राज्याच्या राजकारणामध्ये मोठ्या वेगाने घडामोडी होत आहेत. लोकसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आलेली असताना काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते एकामागून एक असे पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आधी मिलिंद देवरा, नंतर बाबा सिद्दिकी आणि आता अशोक चव्हाण यांनीही पक्षाला राम राम केला आहे.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य

अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहून काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यांच्या या कृतीमुळे काँग्रेसला मोठं खिंडार पडलं असून, पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्यासाठी नाना पटोले तातडीने दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचे किमान 10 आमदार भाजपमध्ये जातील, असा अंदाज आहे.

अशोक चव्हाण यांना भाजप राज्यसभेवर पाठवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, 15 फेब्रुवारी रोजी अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून, त्यावेळीच अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे. शाह यांच्या दौऱ्यादरम्यान अनेक मोठे पक्ष प्रवेश होणार असून, त्याचवेळी चव्हाण हेदेखील भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे.

अधिक वाचा  रोहित शर्माने 2० किलो वजन कमी कसं केलं, संपूर्ण दिवसाचा दिनक्रम अन् आहार

“अनेक चांगले नेते भाजपच्या संपर्कात आहेत. ज्याप्रकारे काँग्रेस पक्ष गेले काही वर्षे वाटचाल करत आहे, त्यातून जनतेशी जोडले गेलेल्या नेत्यांची घुसमट होत आहे. त्यातून देशभरातून काँग्रेसमधील लोकनेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे निश्चितच काही मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आता एवढंच म्हणेन आगे आगे देखीये होता है क्या…”, अशी सूचक प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.