नवी दिल्ली : लोकसभेत आज राम मंदिराच्या बांधकामावर चर्चा पार पडली. यावेळी या चर्चेत एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी देखील भाग घेतला. यावेळी त्यांनी सरकारवर सडकून टीकाही केली. तसेच श्रीरामाबद्दल आपल्याला आदर असल्याचंही म्हटलं आहे.
ओवैसी नेमकं काय म्हणाले?
ओवैसी म्हणाले, मला विचारायचं आहे की, मोदी सरकार एक एका विशिष्ट समाजाचं, धर्माचं सरकार आहे की संपूर्ण देशाचं? भारत सरकारला कुठला धर्म आहे का? मला वाटतं या देशाला कुठलाही धर्म नाही. २२ जानेवारीपासून या सरकारला असा संदेश द्यायचा आहे का? की, एका धर्मानं इतर धर्मांवर विजय मिळवला आहे.
श्रीरामाचा आदर करतो पण…
देशातील १७ कोटी मुस्लिमांना तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे? मी बाबरचा, जिनाचा की औरंगजेबचा प्रवक्ता आहे? मी श्रीरामाचा आदर करतो पण मी नथुराम गोडसेचा द्वेष करतो कारण त्यानं अशा व्यक्तीला मारलं ज्याचे शेवटचे शब्द हे राम असे होते.