नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुणे शहरासह जिल्ह्यातून काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. विद्यमान तीन आमदारांसह सर्वच उमेदवारांना पराभवाचा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या या पराभवाची अनेक कारणे समोर येत आहेत. मात्र त्यामध्ये काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी देखील असल्याचे बोलले जाते.






विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर देखील भाजपमधील अंतर्गत गटबाजी सुरूच असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. निवडणुका झाल्यानंतर आता पुण्यातील काँग्रेसभवन येथील ऑफिसावरून वाद निर्माण झाल्याची माहिती आहे.
विधानसभा निवडणुकीत शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून मनीष आनंद यांनी काँग्रेसमधून बंडखोरी करीत निवडणूक लढवली होती. यावेळी काँग्रेसकडून पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर ती कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये काँग्रेसच्या पुणे शहर महिला अध्यक्ष पूजा मनीष आनंद यांचाही समावेश होता. पूजा आनंद यांना पदमुक्त करण्यात आल्यानंतर या ठिकाणी प्रभारी महिला अध्यक्ष म्हणून संगीता तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संगीता तिवारी यांची नियुक्ती झाल्यानंतर काँग्रेस भवन येथील महिला अध्यक्षांसाठी वापरत असलेलं कार्यालय शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसुचित जाती विभागाला देण्यात आले आहे. त्यामुळे सध्या महिला शहर अध्यक्षांकडे कोणतेही कार्यालय राहिलेले नाही.
संगीता तिवारी म्हणाल्या, “पुणे शहर महिला काँग्रेसचे कार्यालय ऐन निवडणुकीमध्ये सुजित यादव यांनी घेतले आणि आम्हा महिला काँग्रेसला बाहेर केले त्याबद्दल सुजित यादव यांचे हार्दिक अभिनंदन. आपल्या महिला सन्मानाला खरंच आमचा सलाम. अशी महिला सन्मान करणारी लोक जर काँग्रेसमध्ये असतील तर खरंच काँग्रेस खूप पुढे जाईल. असे भविष्य आम्हा महिला भगिनींना दिसत आहे,” याबाबत पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.











