‘पत्रकार वागळेंच्या गाडीवर हल्ला करणारेही कुत्रेच का?’; रोहित पवारांचा फडणवीसांना संतप्त सवाल

0
1

ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांची पुण्यात ‘निर्भय बनो’ ही सभा शुक्रवारी सायंकाळी पार पडली. मात्र, या सभेआधी भाजप कार्यकर्त्यांनी निखील वागळे यांच्या वाहनावर दगडफेक करत गाडीच्या काचा फोडल्या. तसेच गाडीवर शाईफेक करण्यात आली. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

या घटनेनंतर राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही पलटवार केला आहे.’पत्रकार निखील वागळे यांच्या गाडीवर हल्ला करणारे कुत्रेच होते का ? कुत्रे नसतील आणि भाजपचे कार्यकर्ते असतील तर आता आपण राजीनामा देणार का ?’, असा संतप्त सवालच रोहित पवारांनी फडणवीसांना केला आहे.

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे

निखील वागळे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात आक्षेपार्ह ट्विट केल्याचा दावा भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला होता. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक होत वागळे यांची पुण्यातील ‘निर्भय बनो’ ही सभा होऊ न देण्याचा इशारा दिला होता. निखील वागळे हे शुक्रवारी सायंकाळी ‘निर्भय बनो’ या सभेस्थळी जात असताना भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच गाडीच्या काचा फोडत शाईफेक केली. या प्रकारामुळे काही वेळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. या प्रकारावरून रोहित पवारांनी आक्रमक होत थेट फडणवीसांनाच जाब विचारला आहे.

अधिक वाचा  पुण्यात १४ वर्षात नदीची वहन क्षमता घटल्याने पुराचा धोका ४०% नी वाढला

रोहित पवारांनी ‘एक्स’वर काय म्हटलं ?

“गाडीखाली कुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील, असं विधान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आज केलं. मला त्यांना विचारायचंय, ‘पत्रकार निखील वागळे यांची गाडी फोडणारे आणि त्यांच्यावर हल्ला कारणारेही कुत्रेच होते का ? कुत्रे नसतील आणि भाजपचे कार्यकर्ते असतील तर आता तरी आपण राजीनामा देणार का ?”, असा सवाल आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

निखील वागळे यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत ‘कायदा-सुव्यवस्था कोणीही हातामध्ये घेऊ नये, भाजपचं कोणी असलं तरी आम्ही त्यांच्यावर कारवाई करु. मात्र, त्याचवेळी लोकांच्या भावना भडकतील, अशा प्रकारचे वक्तव्य करणं देखील चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. आता रोहित पवारांनी फडणवीसांना आपण राजीनामा देणार का ? असा सवाल केला असून यावर ते काय बोलतात ते पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

अधिक वाचा  कोथरूड सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समिती; 17वा विसर्जन नियोजन महोत्सव…तोच उत्साह …तोच ध्यास!