पाणी पिणं हे आपल्या आरोग्यासााठी अतिशय गरजेचं असतं हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. अनेक प्रकारच्या आजारांपासून वाचण्यासाठी आपल्याला अधिक पाणी पिण्याचा सल्लाही दिला जातो. पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. पण जसं कमी पाणी पिणं आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं तसंच अतीप्रमाणात पाणी प्यायल्यानेही त्रास होऊ शकतो. प्रसंगी मृत्यूचाही धोका उद्भवू शकतो. हो हे खरं आहे. आणि याचं एक उदाहरण नुकतंच पहायला मिळालं.






जास्त पाणी प्यायल्याने झाला महिलेचा मृत्यू
हे वाचणं आणि त्यावर विश्वास ठेवणं थोडं कठीण वाटू शकतं, पण नुकतंच इंडियानामध्ये एका महिलेचा जास्त पाणी प्यायल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ॲश्ले नावाची ही महिला पती आणि दोन मुलांसह वीकेंड ट्रीपसाठी बाहेर गेली होती. तिथे दुसऱ्या दिवशी तिची तब्येत बिघडू लागली. सुरूवातीला ॲश्ले हिला डिहायड्रेशनचा त्रास होऊ लागला, तिचं थोडं डोकं दुखू लागलं आणि उलटीची भावना तिला जाणवू लागली. हा त्रास कमी करण्यासाठी आणि शरीर हायड्रेट करण्यासाठी तिने अवघ्या काही मिनिटांतच २ लीटर पाणी प्यायले.
डिहायड्रेशनचा त्रास दूर करण्यासाठी ॲश्लेने केवळ २० मिनिटांत ४ बाटल्या पाणी प्यायले. साधारणत: एवढं पाणी प्यायला एखाद्या व्यक्तीला संपूर्ण दिवस लागतो. एवढं पाणी प्यायल्याने ॲश्ले हिची तब्येत सुधारण्याऐवजी बिघडू लागली. चौथ्या बाटलीतील पाणी संपवल्यावर ती अचानक जमीनीवर कोसळली , तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तिची तब्येत सतत बिघडत गेल्याने डॉक्टरांनी तिला ICU मध्ये हलवले पण त्यांना अपयश आले. वॉटर टॉक्सिटीमुळे अवघ्या ३५ व्या वर्षी ॲश्लेला जीव गमवावा लागला.
वॉटर टॉक्सिसिटी म्हणजे काय ?
कमी वेळेत गरजेपेक्षा अधिक पाणी प्यायल्याने किंवा आरोग्याच्या समस्यांमुळे किडनीमध्ये अधिक पाणी जमा होण्याच्या या स्थितीला वॉटर टॉक्सिसिटी , वॉटर इनटॉक्सिकेशन किंवा वॉटर पॉयझनिंग म्हटले जाते. या स्थितीत ओव्हरहायड्रेशनमुळे रक्तातील पाण्याचे प्रमाण वाढते, ज्यामुळे मेंदूच्या कार्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. खूप जास्त प्रमाणात पाणी प्यायल्याने त्यातील इलेक्ट्रोलाइट्स पाण्यात डायल्यूट होतात.
काय आहेत लक्षणे ?
वॉटर वॉटर टॉक्सिसिटी मुळे मळमळ, डोकेदुखी, उलट्या, स्नायूंमध्ये पेटके येणे, थकवा, तंद्री, डबल व्हिजन, हाय ब्लड प्रेशर, भ्रम किंवा श्वास घेण्यास त्रास होणे , अशी लक्षणे जाणवू शकतात. वॉटर वॉटर टॉक्सिसिटी च्या गंभीर प्रकरणांमध्ये सेंट्रल नर्व्हस डिसफंक्शन, कोमा, फेफरं येणं, ब्रेन डॅमेज यासारखी लक्षणे दिसतात. कधी-कधी हा त्रास इतका वाढतो की मृत्यूही होऊ शकतो.
वॉटर टॉक्सिसिटी पासून कसा करावा बचाव ?
वॉटर टॉक्सिटीची बरीच प्रकरणे उन्हाळ्यात दिसून येतात. या ऋतूत लोकांना सतत आणि लवकर तहान लागते. अशा परिस्थितीत ते गरजेपेक्षा जास्त पाण्याचे सेवन करतात. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त पाण्याचे सेवन करणे टाळावे. तासानुसार सांगायचं झालं तर प्रत्येक तासाला एक लीटर किंवा त्यापेक्षा कमी पाणी प्यायल्यास ओव्हरहायड्रेशनपासून बचाव होऊ शकतो.













