अजित पवार यांचे पुतणे आणि श्रीनिवास पवार यांचा पुत्र युगेंद्र पवार हे शरद पवार यांच्या भेटीला वाय बी चव्हाण सेंटरमध्ये गेले. तर दुसरीकडे अजित पवार हे श्रीनिवास पवार यांच्या भेटीला गेल्याची माहिती समोर आली. श्रीनिवास पवार हे अजित पवार यांचे सख्खे मोठे बंधू आहेत. दरम्यान दोन्ही भेटींचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार आणि शरद पवार यांच्यात 15 ते 20 मिनिटांची भेट झाली. भेटीनंतर युगेंद्र पवार यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. बैठकीसंदर्भात मला काही बोलायचं नाही असं ते म्हणाले.






सध्या अजित पवार आणि शरद पवार यांचे राजकीय मार्ग वेगळे झाले आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांसह शिंदे फडवीस सरकारला पाठिंबा दिला. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले तर आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या घटनेला आता आठवड्याहून अधिक काळ लोटला आहे. या आठवडाभरात अजित पवार आणि शरद पवार यांनी एकमेकांवर वैयक्तिक टीकाटिप्पणी देखील केली. त्यातच आता या भेटींमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
दोन्ही भेटींच्या टायमिंगची चर्चा
याआधी 2019 मध्ये पहाटेचा शपथविधी झाला होता, त्यावेळी कुटुंबातील सदस्यांनीच अजित पवार यांची मनधरणी करुन त्यांना परत आणलं होतं. आता तशी परिस्थितीत नसली तरी ज्यावेळी अजित पवार हे आपले मोठे बंधू श्रीनिवास पवार यांच्या भेटीसाठी जातात त्याचवेळी त्यांचे पुत्र युगेंद्र पवार हे शरद पवार यांच्या भेटीसाठी वाय बी चव्हाण सेंटरमध्ये पोहोचतात. त्यामुळे या भेटींचा टायमिंग पाहता कुटुंबामध्ये काही बोलणी किंवा चर्चा सुरु आहे का असे तर्कवितर्क लढवले जात आहे. दोन्ही भेटी एकाच वेळी होत असल्यामुळे त्याची चर्चा रंगली आहे.
पहाटेच्या शपविधीवेळीही अजित पवार हे श्रीनिवास यांच्या घरी
पहाटेच्या शपथविधीच्या वेळीही अजित पवार हे श्रीनिवास पवार यांच्या घरी होते. तिथेच त्यांच्या मनधरणी केली जात होती. श्रीनिवास पवार यांच्याच माध्यमातून अजित पवार यांच्याशी संपर्क झाला होता. अजित पवार यांनी वेगळा गट केल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील संबंध काहीसे बिघडले आहेत. त्यामुळे या भेटीनंतर जर वैयक्तिक संबंध सुधारले तर राजकारणातील संबंध सुधारतील का हे पाहावं लागेल.











