राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी पाहायला मिळत आहेत. पक्षात उभी फूट पडल्यानंतर शरद पवारांचा गट विरूद्ध अजित पवारांचा गट असा सामना रंगला आहे. यादरम्यान बंडात सहभागी झालेली चार-पाच मंडळी स्वतःला बाजूला करून अजित पवारांना विलन करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणाले आहेत.






रोहित पवार म्हणाले की, भाजपने एक डाव खेळला आहे. बाळासाबेब ठाकरेंनी मराठी अस्मिता जपण्यासाठी पक्ष काढला तो भाजपने फोडला. भाजपच्या विरोधात देशात वातावरण आहे, त्यावर कोणी बोलू नये अनेक मोठे नेते आपल्यातच गुंतून राहावी यासाठी आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी पक्ष फोडला. उत्तर-प्रत्त्युतर आपल्यातचं देतोय आणि भाजप वेगळं राहतंय, अशी खंतही रोहित पवारांनी बोलून दाखवली.
रोहित पवार पुढे बोलताना म्हणाले की, काल नाशिकमध्ये बोलताना भुजबळांनी बोलताना सहज अजित पवारांना बाजूला काढलं. पक्ष फुटल्याचं खापर त्यांनी अजितदादांवर फोडलं. दुसरीकडे नाशिकमध्ये पोस्टरवर अजित पवारांचा फोटो सुद्धा नव्हता. अजित पवारांना चार-पाच लोकं व्हिलन करत आहेत. दादा मोठे नेते आहेत तो निर्णय कोणालाच पटला नाही. ते (भाजप) एसीमध्ये बसून मजा बघतायत आणि आम्ही आमच्यात भांडतोय. लोकांना माहिती आहे की, कुटुंब- पक्ष कोणी फोडला. लोकं या गोष्टी विसरणार नाहीत असेही आमदार रोहित पवार म्हणाले.
अजित पवारांसोबत गेलेले प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे स्वतःला बाजूला करत आहेत. निर्णय घेताना हा विकासासाठी निर्णय घेतला असं सांगतात मग पदं असताना तुम्ही विकास केला नाही का असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे ही लढाई भूमिका, अस्मिता, स्वाभिमान आणि एका विचाराची आहे असेही रोहित पवार यावेळी म्हणाले.










