मागील काही दिवसांपासून राज्यात औरंगजेबाच्या मुद्यावरून वातावरण तापले आहे. तर काही ठिकाणी यावरून हिंसाचाराच्या घटना देखील समोर आले आहे. विशेष म्हणजे याच मुद्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील होतांना दिसून आले. दरम्यान, अशातच राष्ट्रवादी पक्षातून बीआरएसमध्ये आलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कदीर मौलाना यांनी ‘आपण औरंगजेबाला आदर्श मानतो’ असे वक्तव्य केले आहे. शहरातील सुभेदारी विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या बीआरएस पक्षाच्या पत्रकारपरिषदेत बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले कदीर मौलाना?
सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या बीआरएस पक्षाच्या पत्रकार पत्रकारपरिषदेत बोलतांना कदीर मौलाना म्हणाले की, “औरंगजेब हा चांगला राजा होता. औरंगजेब राजा असताना त्याने अनेक मंदिरांना जागा उपलब्ध करून दिले. तुम्ही कोणाबाबत बोलतात, काही इतिहास माहित नाही. औरंगजेबाने कधीच जातीवाद केला नाही. औरंगजेबाच्या राज्यात गंगा जमुना व्यवस्था नांदत होती. त्यावेळी सत्तेची लढाई होती आणि ती आज देखील सुरु आहे. औरंगजेब एक असा राजा होता ज्याने अखंड भारतावर 50 वर्षांपेक्षा अधिक काळ राज्य केले. तर नक्कीच मी औरंगजेबाला आदर्श मानतो. त्यांनी भारतात राज्य केले असून, नक्कीच तो आदर्श आहे.
भाजपवर टीका…
दरम्यान यावेळी कदीर मौलाना यांनी भाजप देशात मॉब लिंचिंगच्या माध्यमातून, ईडीच्या माध्यमातून, इन्कमटॅक्सच्या माध्यमातून देशात गोंधळाची स्थिती निर्माण करत आहेत. दादागिरी करून, सत्तेचा उपयोग करून लोकांना घाबरून इतर पक्षांना दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे जनतेने विचार करायला विकास कोणता पक्ष करणार आहे.
नव्या वादाला तोंड फुटणार…
एकीकडे राज्यात औरंगजेबाच्या मुद्यावरून वातावरण तापले असतानाच, दुसरीकडे कदीर मौलाना यांनी आपण औरंगजेबाला आदर्श मानत असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. तर यावरून बीआरएस पक्षावर देखील टीका होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे कदीर मौलाना यांच्या या वक्तव्यावरून बीआरएस पक्षातील अनेकजण नाराज असल्याचे देखील बोलले जात आहे.
कोण आहेत कदीर मौलाना?
कदीर मौलाना हे गेल्या 25 वर्षांपासून राष्ट्रवादी पक्षात सक्रीय होते. छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातील एक महत्वाचे मुस्लीम नेते म्हणून त्यांची पक्षात ओळख होती. तर राष्ट्रवादीकडून त्यांना प्रदेश उपाध्यक्ष पदाची महत्वाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून ते नाराज होते. त्यामुळे त्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत बीआरएस पक्षात प्रवेश केला.