मोदी @ 9 ची भाजपची महाजनसंपर्क सभा अकोल्यामध्ये पार पडली. या सभेमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. शिवसेना कार्यकर्त्यांच्या शिबिरामध्ये उद्धव ठाकरे यांनी मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप केला. या आरोपांनाही देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. ‘कुणाच्या बापाचा बाप जरी उतरला, तरी मुंबई महाराष्ट्रातून वेगळी होणार नाही. बहुतेक त्यांचा स्क्रीप्ट रायटर बदलला आहे.






आम्हाला माहिती आहे, कुठे कुठे कशी कशी आग होत आहे. मी परत आलोच पण शिंदेंना सोबत घेऊ आलो,’ असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे. ‘बाळासाहेबांनी सांगितलं होतं, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याची वेळ येईल त्यावेळी शिवसेनेचं दुकान बंद करीन, उद्धव ठाकरे गेले म्हणून आम्ही त्यांचं दुकान बंद केलं,’ असा घणाघात फडणवीसांनी केला. ‘कितीही वेली एकत्र आल्या तरी त्याचा वटवृक्ष होऊ शकत नाही. एक रुपया पाठवला तरी शेवटपर्यंत एक रुपयाच पोहोचतो, म्हणून तुम्ही मोदींसोबत मुकाबला करू शकत नाही. नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राला अनेक योजना दिल्या. 41 लाख तरुणाई आपल्या पायावर उभी राहिली. डबल इंजिन सरकारने नमो शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून 6 हजार राज्याचे आणि 6 हजार केंद्राचे असे 12 हजार रुपये मिळतील,’ असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
‘दिवसा 12 तास वीज मिळण्याकरता योजना आखली आहे. सततच्या पावसाचे पैसे पुढच्या 15 दिवसांमध्ये मिळतील. 50 टक्के आरक्षण केल्यामुळे तोट्यातील एसटी फायद्यात आली. दुष्काळात जाणाऱ्या जिल्ह्याला आम्ही बदलून दाखवू, हिरवागार पश्चिम विदर्भ करून दाखवू,’ असं आश्वासनही फडणवीस यांनी दिलं. ‘मागचं सरकार घरी बसणारं होतं, हे शरद पवारच आत्मचरित्रात म्हणाले आहेत. जे संभाजीनगरमध्ये घडलं जे अकोल्यात घडलं ते अचानक झालं नाही. हे अशांतता निर्माण करण्यासाठी घडवलं. या औरंग्याच्या औलादी कशा पैदा झाल्या?
औरंगजेब आमचा राजा कसा होऊ शकतो? आमचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. आपल्याकडचा मुसलमान औरंगजेबाचा नाही. खुर्चीची गणितं करणाऱ्यांना थारा मिळणार नाही,’ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.











