वैष्णवांचा आनंदसोहळा अर्थात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या दर्शनासाठी आसुसलेल्या भाविकांच्या डोळ्यांचे पारणे आज फिटले. सायंकाळच्या सुमारास या दोन्ही पालख्यांचे पुण्यनगरीत आगमन होताच ‘आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे’ अशी अनुभूती विठुमाऊलीच्या लेकरांना आली. ‘ग्यानबा-तुकाराम’ आणि ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’च्या गजराने अवघे शहर दुमदुमले.
आळंदीवरून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज तर आकुर्डीवरून जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुण्याच्या दिशेने निघाल्या. कपाळी चंदनाचा टिळा… गळ्यात तुळशीची माळ… डोक्यावर तुळशी वृंदावन… हातात भगव्या पताका आणि टाळ-मृदंगांचा अखंड नाद… अशा भक्तीमय वातावरणात पालख्यांनी मार्गक्रमण केले. त्यांच्या स्वागतासाठी पुणेकरांनी दुतर्फा गर्दी केली होती. जागोजागी रांगोळ्या काढून रस्ते सजवण्यात आले होते. फुलांनी सजवलेले रथ दृष्टिपथास येताच नागरिक विठुनामाचा गजर करत होते. पालख्यांसमोरील दिंड्या मार्गस्थ होताना ‘ग्यानबा-तुकाराम’चा जयघोष केला जात होता. पालख्यांवर पुष्पवृष्टीही करण्यात आली.
लाखोंच्या संख्येने वारकरी शहरात प्रवेश करते झाले. मात्र नेहमीप्रमाणे त्यांच्या स्वयंशिस्तीचे दर्शन घडले. दिवसभर उन्हाचा चटका कायम असला तरी भाविकांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. काही ठिकाणी उत्स्फूर्तपणे वारकऱ्यांसह नागरिकांनी फुगड्यांचा फेर धरला. टाळ-मृदंगांच्या तालावर ठेकाही धरला. या क्षणाची छायाचित्रे आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्याचा मोह अनेकांना आवरला नाही. पालखी मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांचे स्वागत करणारे फलक लावण्यात आले होते. सामाजिक संस्था, मंडळे, राजकीय व्यक्ती, खासगी कार्यालयांतर्फे त्यांना खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले.
स्मरणीय क्षण-
– संचेती चौकात पालख्यांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी
– संभाजी भिडे यांनी काही वेळासाठी केले जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचे सारथ्य
– पुण्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. सी. चांडक यांनी काही वेळासाठी केले संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे सारथ्य
– सामाजिक प्रबोधन करणाऱ्या दिड्यांनी वेधले लक्ष
– पालख्यांच्या स्वागतासाठी शहरवासीयांची गर्दी