लंडनमधील ओव्हल स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवला जात आहे. बुधवारी पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियन संघाने 3 गड्यांच्या मोबदल्यात 327 धावा केल्या होत्या. ट्रॅव्हिस हेड 145 आणि स्टीव्ह स्मिथ 95 धावांवर खेळत आहेत. दोघांमध्ये 251 धावांची नाबाद भागीदारी रचली आहे.
पहिल्या दिवसाच्या खेळानंतर कांगारू संघ फ्रंट फूटवर आहे. भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. उपाहारानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ खराब गोलंदाजीमुळे बॅकफूटवर गेला.
पहिल्या सत्रावर भारताचे वर्चस्व
भारतीय गोलंदाजांनी WTC Final च्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रावर आपले वर्चस्व निर्माण केले. भारतीय गोलंदाजांनी या सत्रात ऑस्ट्रेलियाच्या 4 विकेट्स घेतल्या. तर कांगारूंना या सत्रात 24 षटकात फक्त 65 धावा करता आल्या. लंचसाठी खेळ थांबला त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या 7 बाद 422 धावा झाल्या होत्या. अॅलेक्स कॅरी 22 तर पॅट कमिन्स 2 धावा करून नाबाद होते.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशीच्या 3 बाद 327 धावांच्या पुढे खेळण्यास सुरूवात केली. स्टीव्ह स्मिथने दिवसाच्या पहिल्याच षटकाच्या पहिल्या दोन चेंडूवर चौकार मारत आपले शतक पूर्ण केले. या चौकारांमुळे ऑस्ट्रेलिया पहिल्या दिवसाप्रमाणे याही दिवशी वर्चस्व गाजवणार असे वाटते होते. त्यात ट्रेविस हेडने आपले दीडशतक पूर्ण केले.
स्मिथ – हेड जोडी भारताला दुसऱ्या दिवशीही सतावणार असे वाटत असतानाच सिराजने ट्रेविस हेडला 163 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर आलेल्या कॅमरून ग्रीनला शमीने सहा धावांवर बाद करत कांगारूंचा पाचवा फलंदाज माघारी धाडला.
भारताने जरी पाठोपाठ दोन विकेट घेतल्या असल्या तरी स्मिथ अजून क्रिजवर होता. ऑस्ट्रेलिया 400 च्या जवळ पोहचत होती. स्टीव्ह स्मिथ 121 धावा करून मोठी खेळी करण्याच्या इराद्यात होता. मात्र लॉर्ड शार्दुलने त्याचा त्रिफळा उडवत भारताला मोठा दिलासा दिला. यानंतर अक्षरने मिचेल स्टार्कला 5 धावांवर धावबाद करत कांगारूंना लंचपूर्वी सातवा धक्का दिला.