लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तम करणाऱ्यांना विधानसभेची उमेदवारी दिली जाईल, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले असून नव्या चेहऱ्यांचा विचार करीत असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते अजित पवार नुकत्याच नागपुरात झालेल्या ओबीसी शिबिरासाठी आले असता माध्यमांसोबत बोलत होते. प्रथम लोकसभा निवडणूक आहे, त्यानंतर विधानसभा. लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही चाचपणी करत आहोत. नवीन चेहऱ्यांचा विचार केला जात आहे. नवीन चेहरे पुढे येत आहे का, महिलांमधून कुणी पुढे येऊ शकते का, याबाबत विचार विमर्श सुरू असल्याचे ते म्हणाले.






मुंबईमध्येसुद्धा इतर जागांसाठी चर्चा करणार आहे. लोकसभेमध्ये चांगले काम करेल, निकाल चांगला देईल, त्याचा आमदारकीसाठी विचार करू. त्यासाठी इच्छुकांनी अधिक मेहनत घेऊन काम करणे गरजेचे आहे. जो अधिकाधिक लोकांमध्ये राहून काम करेल, त्याला प्रतिसाद नक्कीच मिळेल आणि अशांचाच विचार करण्यात येईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
सत्तेच्या फॉर्म्यूल्याबाबत ते म्हणाले, २००४ सालचा अपवाद वगळता ज्याचे जास्त आमदार त्याचाच मुख्यमंत्री असतो, त्या घटनेला आता १९ वर्षे झालेली आहेत. त्यावेळी जागा जास्त आल्यावरसुद्धा आम्ही मुख्यमंत्रिपद न घेता, चार मंत्रिपद अधिक घेतले होते, असे ते म्हणाले.












