खेड दि. ३ (अधिराज्य) आज भारत देश प्रगतीपथावर असताना अजूनही काही जातीवादी, मनुवादी विचारांनी बुरसटलेला समुदाय ह्या देशात जातीपातीचे विष पेरून सामाजिक तेढ वाढवून समाजात अराजकता माजवण्याची संधी शोधत आहे. मौजे कोतवळी, खालची बौद्धवाडी, ता. खेड जिल्हा रत्नागिरी येथील खेड तालुका बौद्ध सेवा संघ, शाखा क्र. ८० कोतवळी, मुंबई व गाव शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव दि. १२ मे २०२३ रोजी साजरा करण्यात आला.






सदर जयंती महोत्सवाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपुरुषांचे फोटो असलेले शुभेच्छा बॅनर दि. ९ मे २०२३ रोजी कोतवळी, सोनगाव फाटा, लोटे येथे लावण्यात आले होते, परंतु काही समाजकंटकांनी जातीवादी द्वेषापोटी जाणीवपूर्वक सोनगाव, लोटे येथील इतर बॅनर सोडून फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती शुभेच्छा बॅनर ओरबाडून फाडून टाकले, सदर निंदनीय प्रकार कार्यकर्त्यांच्या लक्षात आला परंतु सामाजातील सलोख्याचे वातावरण बिघडू नये म्हणून संयम राखून पूर्वनिर्धारीत १२ मे २०२३ चा कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने साजरा करण्यात आला.
सदर निंदनीय घडणेची पीर लोटे पोलीस ठाणे येथे PSI अधिकारी घाणेकर साहेब यांच्या कडे मुंबई व गावं शाखेच्या वतीने तक्रार नोंदवण्यात आली आहे, परंतु आजवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, PSI घाणेकर साहेब यांच्याकडे संपर्क साधला असता तपासकार्य सुरू आहे असे उत्तर देण्यात येते, म्हणून खेड तालुका बौद्ध सेवा संघाच्या वतीने सदर कृत्याचा निषेध करण्यात येत आहे. जातीवादी माथेफिरू समाजकंटक बॅनर फाडून समाजात फूट पाडू बघत असतील, जातीय दंगली घडवण्याचा मानस ठेवून सदर निंदनीय कृत्य करून सामाजिक सलोखा व शांती भंग करत असतील तर अश्या समाजकंटकांना शोधून त्याना वेळीच जेरबंद केले पाहिजे अन्यथा खेड तालुक्यातील बौद्ध समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करील असा जाहीर इशारा खेड तालुका, बौद्ध सेवा संघ, शाखा क्र. ८० यांनी काढलेल्या परिपत्रकात देण्यात आला आहे.











