कर्नाटकचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये असलेल्या डीके शिवकुमार यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली आहे. आपल्याला मुख्यमंत्रिपद मिळालं नाही, तर उपमुख्यमंत्रिपद किंवा दुसरं कोणतंही मंत्रिपद मान्य नाही, आपण आमदार म्हणूनच राहू, असं शिवकुमार यांनी खर्गेंना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.






‘सिद्धरामैय्या जेव्हापासून काँग्रेसमध्ये आले आहेत, तेव्हापासून ते विरोधी पक्षनेता म्हणून किंवा मुख्यमंत्री म्हणून सत्तेत आहेत,’ असंही शिवकुमार खर्गेंना म्हणाले. एवढच नाही तर तुम्हीही मुख्यमंत्री झाला नाहीत, असंही शिवकुमार यांनी खर्गेंना सांगितलं.
काँग्रेस माझी आई, मंदिर, सगळं काही
काँग्रेस माझ्यासाठी आईसारखी आहे, त्यामुळे राजीनामा द्यायचा प्रश्नच नाही, असं शिवकुमार खर्गेंची भेट घेण्याआधी म्हणाले. जर मी पदाचा राजीनामा देत असल्याची बातमी कुणी चालवत असेल तर मी त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करेन, असा इशाराही शिवकुमार यांनी दिला आहे. माझा पक्ष माझ्यासाठी आई आहे, मी कर्नाटकमध्ये पक्षाला उभं केलं आहे, असं सूचक विधान शिवकुमार यांनी केलं आहे.
‘काँग्रेस पक्ष माझं मंदिर आहे, काँग्रेस पार्टी आमची सगळ्यात मोठी ताकद आहे, त्यामुळे कोणालाही चिंता करण्याची गरज नाही,’ असं शिवकुमार म्हणाले. हायकमांडला तुम्ही मला मुख्यमंत्री करा असं सांगणार का? हा प्रश्न विचारला असता शिवकुमार यांनी मी माझं काम केलं आहे, काँग्रेस माझी आई, मंदिर, सगळं काही आहे, अशी प्रतिक्रिया शिवकुमार यांनी दिली.
काँग्रेस हायकमांडने कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचे दावेदार शिवकुमार आणि सिद्धरामैय्या यांना चर्चा करण्यासाठी दिल्लीला बोलावलं आहे. शिवकुमार सोमवारी तब्येतीचं कारण देऊन आले नव्हते, यानंतर मंगळवारी ते दिल्लीला रवाना झाले. काँग्रेस महासचिवांनी मला एकट्याला यायचे आदेश दिले आहेत, त्यामुळे मी एकटा दिल्लीला जात आहे, असं दिल्लीला जाण्याआधी शिवकुमार यांनी स्पष्ट केलं. दुसरीकडे सिद्धरामैय्या सोमवारपासूनच दिल्लीमध्ये आहेत. शिवकुमार यांच्यानंतर सिद्धरामैय्या यांनीही मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. या भेटीनंतर सिद्धरामैय्या यांनी कोणतीही प्रतिक्रिया द्यायला नकार दिला.












