तळेगाव दाभाडे येथे नगरपरिषद कार्यालयासमोर शुक्रवारी (ता. १२) भरदुपारी जनसेवा विकास समितीचे प्रवर्तक किशोर गंगाराम आवारे (वय ५०) यांचा खून झाला आहे. जमिनीच्या वादातून किंवा राजकीय वैमनस्यातून हा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात नवीन अपडेट समोर येत आहे.या खून प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके, त्यांचे बंधू सुधाकर शेळके यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






आमदार सुनील शेळके यांनी किशोर आवारेंचा खून केल्याचा आरोप आवारेंच्या आईंने केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.याप्रकरणी आवारे यांच्या आई माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके, सुधाकर शेळके, संदीप गराडे, श्याम निगडकर यांच्यासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी किशोर आवारे यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने डोक्यात वार करून सहा जणांच्या टोळक्याने निर्घृण खून केला. ही घटना दुपारी पावणे दोनच्या सुमारास नगरपरिषदेच्या आवारात घडली होती. पोलीस पथक तपास करीत आहे.
१ एप्रिलला मावळातच प्रति शिर्डी शिरगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच प्रवीण गोपाळे यांचीही आवारेंसारखीच निर्घूण हत्या झाली होती. ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून तीन मारेकऱ्यांनी डोक्यात कोयत्याचे घाव घालून साई मंदिरासमोरच गोपाळेंचा खून केला होता. खून करण्यापूर्वी मारेकऱ्यांनी घटनास्थळाची रेकी केली होती. पाळत ठेवून त्यांनी हल्ला केला होता. तसेच आवारेंवरही पाळत ठेवून दबा धरून त्यांना मारण्यात आले.










