कृषी विषयाचा शालेय शिक्षण अभ्यासक्रमात समावेश होणार

0

शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्यात येणार आहे. कृषी विषयाचा समावेश अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याबाबतचा प्राथमिक अहवाल आज (ता. 25) शिक्षण विभागाने स्वीकारला आहे. याबाबत तज्ज्ञांची समिती नेमून अभ्यासक्रमाचा आराखडा निश्चित केला जाणार असल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

यासंदर्भातील अहवाल कृषिमंत्री सत्तार यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे आज सुपूर्त केला. यावेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल. शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव ई. मु. काझी, सहसचिव (कृषी) बाळासाहेब रासकर, महाराष्ट्र राज्य कृषी परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, कृषी संचालक (शिक्षण) प्रा. डॉ. उत्तम कदम, संचालक (संशोधन) डॉ. हरिहर कौसडीकर, अवर सचिव उमेश चांदिवडे आदींची यावेळी उपस्थिती होती.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

विद्यार्थ्यांचा कृषीकडे ओढा वाढेल..

कृषी केंद्रीत आशयामुळे शेतीचे अध्ययन होईल. शेतीकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढेल तसेच शेती व शेती व्यवसाय करणाऱ्यांबद्दल जाणीव व संवेदनशीलता निर्माण होईल, असा विश्वास यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, शालेय विद्यार्थ्यांना लहानपणापासून शेतीविषयक ज्ञान मिळाले तर पुढील जीवनात त्यांना त्याचे महत्व निश्चितच समजण्यास उपयुक्त ठरणार आहे.

कृषी शिक्षणविषयक एकात्मिक आराखडा तयार करताना इयत्ता पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी आणि नववी ते दहावी अशा पद्धतीने अभ्यासक्रम ठेवावा. कृषी विषयक प्रशिक्षणासाठी जे जे साहित्य आणि मदत लागेल, ते करण्याची कृषी विभागाची भूमिका असल्याचे अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

शालेय अभ्यासक्रमातील इतर सर्व विषयांच्या सहसंबंधातून शेतीचे महत्व, उपयोजना, व्यवसाय संधी, शेतीविषयक जाणीव अशा अनेक पैलूंकडे लक्ष केंद्रीत करुन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे शक्य होईल, असा विश्वास मंत्री श्री. सत्तार यांनी व्यक्त केला.